Coronavirus: दिलासादायक! देशात घटली कोरोनाची R-व्हॅल्यू; मात्र मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईसाठी धोका कायम
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2021 22:45 IST2021-09-21T22:45:02+5:302021-09-21T22:45:45+5:30
Coronavirus in India: एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच देशासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

Coronavirus: दिलासादायक! देशात घटली कोरोनाची R-व्हॅल्यू; मात्र मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईसाठी धोका कायम
नवी दिल्ली - एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच देशासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील कोविड-१९ चा आर व्हॅल्यू घटून १ टक्क्याच्या आत आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तो १.१७ होता. त्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत तो घटून ०.९२ झाला. तज्ज्ञांच्या मते यामधून देशात कोरोनाचा फैलाव होण्याचा वेग मंदावल्याचे स्पष्ट होत आहे. ( R-value of corona decreased in the country; However, the threat remains for Mumbai, Bangalore and Chennai)
मात्र मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरूसारख्या मोठ्या शहरांमध्ये अजूनही आर व्हॅल्यू एक टक्क्याच्या आसपास आहे. दिल्ली आणि पुण्यामध्ये आर व्हॅल्यू अजूनही एक टक्क्यापेक्षा कमी आहे. तसेच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत असलेल्या केरळ आणि महाराष्ट्रामधील आर व्हॅल्यूसुद्धा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. ही बाब या दोन्ही राज्यांसाठी दिलासादायक आहे.
ऑगस्टच्या अखेरीस ही आर व्हॅल्यू १.१७ होती. ती ४ ते ७ सप्टेंबरदरम्यान घटून १.११ झाली. आणि तेव्हापासून ती १ टक्क्याच्या खाली आहे. गणितीय विज्ञान संस्था, चेन्नईचे सीताभ्रा सिन्हा यांनी सांगितले की, दिलासादायक बाब म्हणजे केरळ आणि महाराष्ट्रात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक असूनही भारताचा रिप्रॉडक्शन नंबर सातत्याने १ पेक्षा कमी आहे. आकडेवारीनुसार मुंबईचा आर-व्हॅल्यू १.०९ आहे. चेन्नईचा १.११ आहे. कोलकाताचा १.०४ आहे तर बंगळुरूचा १.०६ आहे. भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असताना ९ मार्च ते २१ एप्रिलपर्यंत देशातील एकूण आर व्हॅल्यू १.३७ होती.
रिप्रोडक्शन नंबर किंवा आर व्हॅल्यूमधून सरासरी किती लोकांना संसर्ग झाला आहे हे दाखवले जाते. दुसऱ्या भाषेत सांगायचे तर विषाणू किती वेगाने पसरतो आहे हे दाखवले जाते. देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असताना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे रुग्णालये आणि आरोग्याची पायाभूत चौकट कोलमडली होती. त्यानंतर आर व्हॅल्यूमध्ये सातत्याने घट होत चालली आहे.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशामधील रिकव्हरी रेट हा ९७.७५ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशामधील साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट २.०८ आहे. जो गेल्या ८८ दिवसांपासून ३ टक्क्यांच्या आत आहे.