Coronavirus: ...म्हणून 'जनता कर्फ्यू'साठी 22 मार्चचा दिवसच सर्वोत्तम; ज्योतिषांनी सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 07:04 PM2020-03-21T19:04:38+5:302020-03-21T19:10:20+5:30

Coronavirus: ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांमधील राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तींचा कारक मानला जातो.

coronavirus pm narendra modi appeal for janata curfew connection with rahu astrology ajg | Coronavirus: ...म्हणून 'जनता कर्फ्यू'साठी 22 मार्चचा दिवसच सर्वोत्तम; ज्योतिषांनी सांगितलं कारण

Coronavirus: ...म्हणून 'जनता कर्फ्यू'साठी 22 मार्चचा दिवसच सर्वोत्तम; ज्योतिषांनी सांगितलं कारण

Next
ठळक मुद्दे रविवारी 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन नरेंद्र मोदींनी केलंय.गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहु आणि शनिच्या  प्रभावाखाली असतात.22 मार्च रोजी संध्याकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ आहे.

जगातील शंभरहून अधिक देशांमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूशी दोन हात करण्याचं मोठं आव्हान भारतापुढे उभं ठाकलंय. केंद्र सरकार आणि सगळीच राज्य सरकारं अत्यंत गंभीरपुढे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. देशातील कोरोना बाधितांची संख्या 298 पर्यंत पोहोचलीय आणि पुढचे सात-आठ दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचं सगळेच जाणकार सांगताहेत. या पार्श्वभूमीवरच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 130 कोटी देशवासीयांना उद्याच्या रविवारी, म्हणजे 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत 'जनता कर्फ्यू' पाळण्याचं आवाहन केलंय. त्यांनी 'जनता कर्फ्यू'साठी एकच दिवस का निवडला आणि हाच दिवस का निवडला, या प्रश्नांचं ठोस उत्तर मिळू शकत नाही. मात्र, हा दिवस 'जनता कर्फ्यू'साठी अत्यंत योग्य असल्याचा दावा ज्योतिष अभ्यासकांनी केला आहे. तसंच, थाळी नाद, घंटानाद, शंखनादही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, नऊ ग्रहांमधील राहु हा ग्रह जीवाणू, विषाणू आणि आपत्तींचा कारक मानला जातो. गंभीर आजार किंवा साथीचे आजार पसरवणारे विषाणू हे राहु आणि शनिच्या  प्रभावाखाली असतात. हे विषाणू हवा प्रदूषित करतात. राहुचा अंक 4 आहे आणि 22 या तारखेतील दोन संख्यांची बेरीज 4 होते. तसंच 22 मार्चला शततारका नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू ग्रह आहे, अशी 'कुंडली' ज्योतिष अभ्यासक आचार्य डॉ. ज्योतिवर्धन साहनी यांनी मांडली आहे.

22 मार्च रोजी संध्याकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहुकाळ आहे. या कालावधीत वातावरणातील विषाणू हटवण्यासाठी शंखनाद आणि घंटानाद केला जातो, याकडेही डॉ. साहनी यांनी लक्ष वेधलंय. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी झटणाऱ्या राष्ट्ररक्षकांना दाद देण्यासाठी रविवारी संध्याकाळी 5 वाजता टाळ्या, घंटा, थाळ्या वाजवण्याची साद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. 

ज्योतिषशास्त्र मानायचं की नाही, हा शेवटी ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. या सगळ्या मांडणीनुसार, कोरोना विषाणूशी मुकाबला करण्यासाठी उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. ज्यांना हे शास्त्र पटत नाही, त्यांनी या मांडणीचा विचार करू नये. मात्र, गर्दी टाळणं, अधिक माणसांच्या संपर्कात न येणं हेच कोरोना  संसर्ग रोखण्याचं प्रभावी माध्यम आहे हे वास्तव प्रत्येकालाच मान्य करावं लागेल. त्यामुळे पुढचे काही दिवस काम असेल तरच बाहेर पडा, ही सर्व नेत्यांचं आणि यंत्रणांचं आवाहन प्रत्येकानं ऐकणं, आवश्यक पथ्यं पाळणं अत्यावश्यक आहे.

महाराष्ट्रातील रुग्णांचा आकडा वाढला! 

आज राज्यात कोरोनाचे एकूण १२ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ८ रुग्ण मुंबई येथील तर २ जण पुण्याचे आहेत. यवतमाळ आणि कल्याणमधील प्रत्येकी एकाला कोरोनाची लागण झालीय. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे.

कोरोना कसा पसरतो?; मोदींचा व्हिडीओ

जनता कर्फ्यूच्या एक दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. तुमचं एक मिनिट कोरोनाचा प्रसार थांबवू शकतं, असं नमूद करत कोरोनाचा संसर्ग कसा होतो, हे त्यांनी व्हिडीओद्वारे सांगितलंय. 


 

Web Title: coronavirus pm narendra modi appeal for janata curfew connection with rahu astrology ajg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.