Coronavirus News : थर्मल स्क्रिनिंग करणारे यंत्रमानव कोरोना रुग्णांच्या दिमतीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 00:18 IST2020-05-17T00:17:33+5:302020-05-17T00:18:08+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : क्लब फर्स्ट या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भुवनेश मिश्रा यांनी सांगितले की, आम्ही बनविलेले यंत्रमानव कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये अत्यंत उपयोगी ठरतील.

Coronavirus News : थर्मल स्क्रिनिंग करणारे यंत्रमानव कोरोना रुग्णांच्या दिमतीला
जयपूर : कोरोना रुग्णांवर उपचार करताना डॉक्टर व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर येणारा ताण व संसर्गाचा धोका कमी होण्यासाठी ही सर्व कामे करणारे यंत्रमानव राजस्थानातील क्लब फर्स्ट या कंपनीने तयार केले आहेत. थर्मल स्क्रि निंग करण्यापासून ते एखाद्या माणसाने मास्क घातला आहे की नाही हे ओळखण्याचे कसब या यंत्रमानवांकडे आहे.
क्लब फर्स्ट या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भुवनेश मिश्रा यांनी सांगितले की, आम्ही बनविलेले यंत्रमानव कोरोना रुग्णांवरील उपचारांमध्ये अत्यंत उपयोगी ठरतील. त्यांच्या वापरामुळे कोरोना रुग्णांच्या निकट संपर्कात जाण्याचा डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना असलेला धोकाही कमी होईल.
राजस्थानमधील या अनोख्या यंत्रमानवांनी आता देशातील वैद्यकक्षेत्राचे लक्ष वेधून घेतले आहे. मिश्रा म्हणाले की, या यंत्रमानवाचे ९५ टक्के सुटे भाग भारतातच बनविले आहेत. स्पाइन टेक्नॉलॉजीचा वापर करून बनविलेले जगातील हे पहिले यंत्रमानव आहेत. कोणताही मॅग्नेटिक पाथ न अवलंबणारे हे यंत्रमानव स्वयंसूचनेनुसार काम करतात. याआधी बंगळुरू येथील एका रुग्णालयाने कोरोना रुग्णांच्या तपासणी व स्क्रिनिंगसाठी यंत्रमानवांची मदत घेतली होती. मित्र या नावाने ओळखले जाणारे यंत्रमानव या रुग्णालयाच्या सेवेत आहेत.
एखाद्या माणसाला ताप, कफ, सर्दी अशी कोरोना आजारसदृश्य लक्षणे असतील तर ती ओळखण्याचेही कसब या यंत्रमानवांमध्ये आहे. बंगळुरूच्या रुग्णालयातील एका अधिकाºयाने सांगितले की, या रुग्णालयातील यंत्रमानवांकडून दोन टप्प्यांमध्ये स्क्रिनिंग केले जाते. तिरुचिरापल्ली येथील एका सॉफ्टवेअर कंपनीनेही तामिळनाडूतील एका सरकारी रुग्णालयाला दहा यंत्रमानव भेट दिले होते. त्यांच्या सहाय्याने या रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले जातात.