CoronaVirus News : रांचीत अंत्यसंस्कारांसाठी लागल्या रांगा, जागेअभावी रस्त्यांवर जाळण्यासही लोक झाले अगतिक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 12:39 AM2021-04-17T00:39:58+5:302021-04-17T06:49:26+5:30

CoronaVirus News: मृतांची संख्या एवढी वाढली की, मुक्तिधामात अंत्यसंस्कार करण्यास जागा कमी पडत आहे. लोकांना अनेक तास प्रतीक्षा करून आपल्या नातेवाइकांवर अंत्यसंस्कार करता येत नाहीत.

CoronaVirus News: Queues for funerals in Ranchi, people burnt on roads due to lack of space | CoronaVirus News : रांचीत अंत्यसंस्कारांसाठी लागल्या रांगा, जागेअभावी रस्त्यांवर जाळण्यासही लोक झाले अगतिक

CoronaVirus News : रांचीत अंत्यसंस्कारांसाठी लागल्या रांगा, जागेअभावी रस्त्यांवर जाळण्यासही लोक झाले अगतिक

Next

- एस. पी. सिन्हा 

रांची : झारखंडमध्ये कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या रोज वाढत आहे. राजधानी रांचीत गेल्या दहा दिवसांत स्मशानभूमी आणि कब्रस्तानात मृतदेह येण्याची संख्या अचानक वाढली. मृतांची संख्या एवढी वाढली की, मुक्तिधामात अंत्यसंस्कार करण्यास जागा कमी पडत आहे. लोकांना अनेक तास प्रतीक्षा करून आपल्या नातेवाइकांवर अंत्यसंस्कार करता येत नाहीत.

याचा परिणाम असा झाला की, लोकांनी आता उघड्यावर चिता रचून अंत्यसंस्कार सुरू केले आहेत. एका ठिकाणी तर लोक रस्त्याच्या मध्ये चितेवर मृतदेह जाळतानाची छायाचित्रे समोर आली होती. स्मशानात जागा नाही म्हणून मुक्तिधामच्या समोर रस्त्यावरील वाहनांच्या पार्किंगमध्ये मृतदेह ठेवून अंत्यसंस्कार केले जात आहेत. १२  कोरोना संक्रमित मृतदेहांचा दाहसंस्कार घाघरात सामूहिक चितेवर केला गेला.

रातू रोड आणि कांटाटोली कब्रस्तानमध्येही दफन करण्यासाठी लांब रांगा दिसल्या आहेत. सगळ्यात जास्त मृतदेहांचा दाहसंस्कार हरमूस्थित मुक्तिधाममध्ये केला जात आहे.  हरमू स्मशानभूमीत गेल्या अनेक वर्षांपासून अंत्यसंस्कार करणारे राजू राम यांनी म्हटले की, ‘मी असे भयानक दृश्य कधी पाहिले नाही. लोक आपल्या कुटुंबीयाच्या अंत्यसंस्कारांसाठी आर्जव करीत आहेत.

पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी
-    याबाबत लोक महानगरपालिकेवर आपली नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, आधी रुग्णालयात खाट मिळण्यासाठी आटापिटा करावा लागला. आता अंत्यसंस्कार करण्यासही प्रतीक्षा करावी लागत आहे. ते म्हणाले की, कोरोनाबाबत सरकारने पर्यायी व्यवस्था करायला हवी. 
-    अशी हृदयविदारक दृश्ये पाहून लोकांनी प्रशासनाकडे अंत्यसंस्कारासाठी आवश्यक व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. स्मशान घाटांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनीही म्हटले की, आम्ही अशी दृश्ये या आधी कधी पाहिली नाहीत.

Web Title: CoronaVirus News: Queues for funerals in Ranchi, people burnt on roads due to lack of space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.