CoronaVirus News: More than 13,000 new corona patients were found in the country on Wednesday | CoronaVirus News: देशात बुधवारी आढळले कोरोनाचे १३ हजारांहून अधिक नवे रुग्ण; १०४ जणांचा बळी

CoronaVirus News: देशात बुधवारी आढळले कोरोनाचे १३ हजारांहून अधिक नवे रुग्ण; १०४ जणांचा बळी

नवी दिल्ली : देशामध्ये बुधवारी कोरोनाचे १३,७४२ नवे रुग्ण आढळले तर १०४ मरण पावले. रुग्णांची एकूण संख्या १ कोटी १० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. त्यातील १ कोटी ७ लाख लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण ९७.२५ टक्के झाले आहे. 

कोरोना बळींची संख्या १ लाख ५६ हजारांपेक्षा अधिक व मृत्युदर १.४२ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाख ४६ हजार असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १.३३ टक्के आहे. देशातील २१ कोटी लोकांच्या आतापर्यंत कोरोना चाचण्या करण्यात आल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने म्हटले  आहे.  

महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीर या ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने तिथे साथीचा अधिक समर्थपणे मुकाबला करण्याकरिता केंद्र सरकारने उच्चस्तरीय पथके रवाना केली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव स्तरावरील अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील प्रत्येक पथकात तीन सदस्य आहेत. राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्यांना ही पथके साथ नियंत्रणाच्या कामात मदत करणार आहेत. 

दिल्लीत येणाऱ्यांनो,  द्या कोरोना निगेटिव्ह अहवाल!

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, छत्तीसगढ, मध्य प्रदेश या  पाच राज्यांमधून दिल्लीत बस, विमान, ट्रेनद्वारे येणाऱ्या प्रवाशांनी कोरोनाची बाधा झाली नसल्याचा चाचणी अहवाल सादर करावा, असा आदेश दिल्ली सरकारने दिला आहे. तो १५ मार्चपर्यंत लागू राहील. कोरोनामुळे गेल्या काही दिवसांत मरण पावलेल्यांमध्ये महाराष्ट्रातील ५१ टक्के तर केरळमधील १४ टक्के लोक आहेत. गेल्या आठवड्यात महाराष्ट्रासह १२ राज्यांमध्ये दररोज सरासरी १००पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आले. 

१९ राज्यांमध्ये एकही बळी नाही

गेल्या चोवीस तासांत १९ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. त्यामध्ये गुजरात, हरयाणा, राजस्थान, ओडिशा, झारखंड आदी राज्यांचा समावेश आहे. 

सुमारे सव्वा कोटी लोकांना दिली लस 

आतापर्यंत १ कोटी २१ लाख लोकांना कोरोना लस देण्यात आली असून, त्यापैकी १ कोटी ७ लाख लोकांना पहिला डोस व १३ लाख ९८ हजार लोकांना दुसरा डोसही देण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: More than 13,000 new corona patients were found in the country on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.