CoronaVirus News: थायलंडच्या बौद्ध बांधवांकडून भारताला तब्बल २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 08:09 IST2021-05-30T08:09:25+5:302021-05-30T08:09:43+5:30
डॉ. हर्षदीप कांबळे यांचा पुढाकार

CoronaVirus News: थायलंडच्या बौद्ध बांधवांकडून भारताला तब्बल २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
नागपूर : थायलंड येथील बौद्ध उपासक, उपासिकांकडून राज्य सरकारच्या उद्योग खात्याचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे व त्यांच्या पत्नी रोजाना यांच्या माध्यमातून भारताला २०० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले आहेत. यातील ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नागपूरलाही मिळाले असून, शनिवारी पालकमंत्री नितीन राऊत यांनी ते विभागीय आयुक्तांना सुपूर्द केले.
देशात कोरोनाची परिस्थिती पाहता भन्ते अजाहन जयासारो यांनी ‘दानपारमिता’ अंतर्गत मदतीचे आवाहन केले होते. त्याला थायलंडच्या बौद्ध नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या पत्नी रोजाना व्यनिच कांबळे या थायलंड येथील प्रसिद्ध उद्योजिका आहेत. त्यांच्या माध्यमातून देशभरात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मदत पोहोचविली जात आहे. रविवारी पाच लिटर क्षमतेचे ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर नागपूरला मिळाले. पालकमंत्री राऊत यांनी डॉ. हर्षदीप कांबळे व रोजाना तसेच थायलंडच्या बौद्ध उपासक व उपासिकांचे राज्य सरकारतर्फे आभार मानले.
ॲम्ब्युलन्स-व्हेंटिलेटर्सचीही मदत
थायलंडतर्फे भारताला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसोबतच ॲम्ब्युलन्स व व्हेंटिलेटर्सचीही मदत केली जात आहे. आतापर्यंत नागपूरसह, औरंगाबाद, राजगीर, नालंदा, बुद्धगया, सारनाथ, कुशीनगर, श्रावस्थी येथील बुद्धविहारे व रुग्णालयांनाही उपरोक्त वस्तू भेट देण्यात आल्या आहेत.