Coronavirus News: Hospitals are providing Home Care Assistance to Covid 19 patients | कोरोनारुग्णांना घरच्या घरी उपचार देताहेत हॉस्पिटल्स, जाणून घ्या १७ दिवसांची ट्रिटमेंट अन् फायदे!

कोरोनारुग्णांना घरच्या घरी उपचार देताहेत हॉस्पिटल्स, जाणून घ्या १७ दिवसांची ट्रिटमेंट अन् फायदे!

ठळक मुद्देराज्य सरकारे आता सौम्य किंवा मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला देत आहेत. काही खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना ‘होम केअर असिस्टन्स’ देण्यास सुरुवात केली आहे.रुग्णाला एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येते, रोज फोनवरून संपर्क साधला जातो.

>> १७ दिवसांचा ‘होम केअर असिस्टन्स’

>> व्हिडीओ कॉन्फरन्सिंग, अ‍ॅप वरून देखभाल-देखरेख

नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांना दाखल करून घेण्यासाठी रुग्णालयातही जागा अपुरी पडत असल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अधिकाधिक राज्य सरकारे आता सौम्य किंवा मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच अलगीकरणात राहण्याचा सल्ला देत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच, काही खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना ‘होम केअर असिस्टन्स’ देण्यास सुरुवात केली आहे.

गुरुग्राममध्ये कोरोनाच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली. त्यानंतर दिल्लीतील काही रुग्णालयांनी ‘होम केअर असिस्टन्स’चा प्रयोग सुरू केला. यात, कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाशी डॉक्टर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सल्लामसलत करतात. रुग्णाला नेमका काय आणि किती त्रास होतोय, हे त्यावरून लक्षात येतं. त्याला अ‍ॅडमिट करायची गरज नाही, याची खात्री झाल्यानंतर, रुग्ण ‘होम केअर असिस्टन्स’ पॅकेज घ्यायचं का हे ठरवू शकतात. त्यानंतर त्यांना घरातच कशाप्रकारे काळजी घ्यायची, याबाबत आवश्यक सूचना केल्या जातात. रुग्णाला एक अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येते. त्यात नाडीचा अभ्यास आणि वेळेवर रुग्णाच्या शरीराच्या तापमान तपासणीचा समावेश आहे. या डेटाचे परीक्षण डॉक्टरांची टीम करते, अशी माहिती फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुरुग्रामच्या विभागीय संचालक डॉ. रितू गर्ग यांनी एका इंग्रजी वेबसाईटला दिली.

रुग्णाशी रोज फोनवरून संपर्क साधला जातो. आहारतज्ज्ञ आणि मानसोपचारतज्ज्ञांचा सल्लाही रुग्ण घेऊ शकतात. या उपचारांदरम्यान रुग्णाला श्वसनाचा त्रास जाणवू लागला किंवा अन्य एखादं गंभीर लक्षण दिसलं तर त्याने त्वरित रुग्णालयात संपर्क साधायचा असतो. गरजेनुसार त्याला रुग्णवाहिका पुरवली जाते. सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा उपचारांचा कालावधी 17 दिवसांचा आहे.

मेदांता, फोर्टिस, सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, मॅक्स हेल्थकेअर आणि पोर्टेआ या रुग्णालयांमध्ये होम केअर असिस्टन्स पॅकेज उपलब्ध आहेत. अर्थातच, ती निःशुल्क नाहीत. 17 दिवसांच्या या ‘होम केअर असिस्टंट पॅकेज’ची किंमत 6,000 रुपयांपासून 25,000 रुपयांपर्यंत असू शकते. पण, हॉस्पिटलवर, आरोग्य यंत्रणेवरचा वाढलेला ताण बघता ती फायदेशीर ठरणारी आहेत. ज्यांची घरं मोठी आहेत, हॉस्पिटलमध्ये राहणं ज्यांना जिकिरीचं वाटतंय, घरी आवश्यक गोष्टी सहज मिळू शकताहेत, असे रुग्ण हा पर्याय निवडू शकतात. घर मोठं आहे, पण लक्ष द्यायला कुणी नसेल तर देखभाल करणारी व्यक्ती, रक्तदाब तपासणारं यंत्र आणि इतर सुविधाही हॉस्पिटलद्वारे अतिरिक्त शुल्क आकारून पुरवल्या जात आहेत. गुरुग्राममध्ये २५ जणांनी होम केअर असिस्टन्स पॅकेज घेतल्याचं डॉ. गर्ग यांनी सांगितलं. त्यामुळे ज्यांच्यामध्ये गंभीर स्वरूपाची लक्षणं आहेत, त्यांना बेड उपलब्ध करून देणं रुग्णालयांनाही शक्य होतंय. काही रुग्णालये घरातील अलगीकरणातील रुग्णास पुरवित असलेल्या किटमध्ये थर्मामीटर आणि ऑक्सिजन मीटरचाही समावेश आहे.

गुरुग्राममधील मॉडेलचे अनुकरण करीत गुजरातमधील खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांना होम केअर असिस्टन्स देत आहेत. कर्नाटक राज्यसुद्धा कोरोनारुग्णांची घरगुती देखभाल करणारं मॉडेल अवलंबण्याच्या विचारात आहे. परदेशात अनेक हॉस्पिटल्स कोरोना रुग्णांवर अशा प्रकारे उपचार करत आहेत आणि त्यांना यशही आलंय.

कोणत्या टप्प्यावर रुग्णाने रुग्णालयातच जावे?

>> श्वास घेण्यात अडथळा येणे

>> छातीत सतत वेदना होणे आणि दबाव वाढणे

>> मानसिक गोंधळ उडणे

>> ओठ अन् चेहरा निळसर पडणे

आपण घरातली अलगीकरण कधी बंद करू शकता?

>> लक्षणे दिसायला लागल्यापासून (किंवा नमुना घेण्याच्या तारखेपूर्वी, पूर्व-लक्षणात्मक प्रकरणांसाठी) 17 दिवस वेगळे असणे आवश्यक आहे.

>> या कालावधीत किमान 10 दिवस ताप नसावा

>> घराचा अलगीकरणाचा कालावधी संपल्यानंतर चाचणी घेण्याची आवश्यकता नाही.

Disclaimer: ‘फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus News: Hospitals are providing Home Care Assistance to Covid 19 patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.