CoronaVirus News: Funeral on 5 bodies on a single; Gujarat has the highest actual death toll from corona | CoronaVirus News : एकाच चितेवर 5 मृतदेहांवर अंत्यसंस्कार; गुजरातमध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची प्रत्यक्ष संख्या जास्त

CoronaVirus News : एकाच चितेवर 5 मृतदेहांवर अंत्यसंस्कार; गुजरातमध्ये कोरोनामुळे मरण पावलेल्यांची प्रत्यक्ष संख्या जास्त

अहमदाबाद : सुरत शहरात एका स्मशानभूमीत बुधवारी रात्री एका चितेवर पाच मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले गेले. याचा उद्देश असा होता की, अंत्यसंस्कारासाठी प्रतीक्षा करीत असलेल्या मृतदेहांची संख्या कमी व्हावी. ही परिस्थिती फक्त सूरतमधील नाही तर संपूर्ण गुजरातमध्ये स्मशानभूमीतील आहे. 
स्मशानभूमीत २४ तास अंत्यसंस्कार सुरू आहेत, तरीही मृतदेहांची संख्या कमी होत नाही. बहुतांश मृत्यू हे कोरोनाबाधेमुळे होत आहेत. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर स्मशानभूमीत पोहोचत असलेल्या मृतदेहांची संख्या आणि सरकारी आकडेवारी यांच्यात जमीन-आकाशाचे अंतर आहे. सूरत, वडोदरा, अहमदाबाद आणि राजकोट महानगरपालिकेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातील संख्या पाहिली तर रोज २५ मृत्यू होत असल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मृत्यू किती तरी जास्त आहेत.

७ ते १५ एप्रिल दरम्यान ९० मृत्यू
मध्य गुजरातमधील वडोदरातील सगळ्यात मोठ्या एसएसजी रुग्णालयात गेल्या नऊ दिवसांत कोविड आयसीयूमध्ये कमीतकमी १८० जणांचा मृत्यू झाला. भडोचमध्ये आठ दिवसांत २६० कोविड-१९ रुग्णांचा मृत्यू झाला. सरकार फक्त ३६ मृत्यूच झाल्याचे म्हणते. वडोदरातील जीएमईआरएस वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे आकडे पाहिले तर कोविड आयसीयूत सात ते १५ एप्रिल दरम्यान ९० मृत्यू झाले. प्रत्यक्षात चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर आयसीयूत रोज किमान १५ जणांचा मृत्यू होत आहे.
एका आठवड्यात रोज किमान ५० कोरोना रुग्णांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले जात आहेत. दोन दिवसांत ही संख्या १०० झाली. राजकोट जिल्ह्यात आठ ते १४ एप्रिल दरम्यान कोविड रुग्णालयात २९८ पेक्षा जास्त मृत्यू झाले तरी सरकारी दप्तरात फक्त ५७ मृत्यूंची नोंद आहे. गुरुवारी राजकोटमध्ये इतर ८२ जणांचा मृत्यू झाला. सूरतमध्ये दोन मोठ्या स्मशानभूमीत पाच ते १३ एप्रिल दरम्यान रोज जवळपास ८० दाह संस्कार झाले. येथे तीन नव्या स्मशानभूमी सुरू केल्या गेल्या. 
नवनिर्मित पाल स्मशानभूमीत रोज किमान २०-२० अंत्यसंस्कार केले जात आहेत.

१० स्मशानभूमीत १०० अंत्यसंस्कार

वडोदरातील या दोन सरकारी रुग्णालयांत एका आठवड्यात ३५० जणांचा मृत्यू झाला.  भडोचच्या स्मशानभूमीतील रजिस्टरमध्ये एका आठवड्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या २६० जणांचे अंत्यसंस्कार केले गेले. 
जिल्ह्यात अधिकृत नोंद ही ३६ मृत्यूंची आहे. नर्मदा नदीच्या काठावर दाह संस्कार करणारे धर्मेश सोळंकी म्हणाले की, गेल्या एक आठवड्यापासून रोज २२-२५ कोरोनामुळे मरण पावलेल्यांचे दाह संस्कार होत आहेत. 
रोज जवळपास साडेसात हजार किलोग्रॅम लाकडाचा पुरवठा होत आहे. अहमदाबादेत गेल्या चार दिवसांत दहा स्मशानभूमीत जवळपास १०० मृतदेहांवर दाह संस्कार झाला आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus News: Funeral on 5 bodies on a single; Gujarat has the highest actual death toll from corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.