CoronaVirus News: कोरोना लक्षणं असलेल्या नक्षलींना तळ सोडण्यास सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:10 IST2020-06-19T03:23:43+5:302020-06-19T07:10:36+5:30
एखादा नक्षली गावात परतल्यास पोलिसांना तातडीने माहिती देण्याचे आवाहन

CoronaVirus News: कोरोना लक्षणं असलेल्या नक्षलींना तळ सोडण्यास सांगितलं
रायपूर : कोरोना महामारीची लक्षणे दिसणाऱ्या नक्षलवाद्यांना तळ सोडण्यास सांगितले जात आहे. छत्तीसगडच्या बस्तर भागात असे प्रकार घडले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. नक्षली तळांवर कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी ही कृती केली जात असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे.
बिजापूर जिल्ह्यातून एक महिला नक्षली तिच्या मूळ गावी परतली आहे. तिला ताप आल्यानंतर साथीदारांनी तळ सोडण्यास सांगितले होते. तिच्याप्रमाणे ज्या नक्षलींमध्ये थंडी आणि कफची लक्षणे दिसत आहेत, त्यांनाही तळ सोडण्यास सांगितले जात आहे, असे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तिची चौकशी केली असता, तिने सांगितले की, तिला ताप, थंडी व कफचा त्रास होऊ लागल्यावर तळ सोडण्यास सांगण्यात आले. तिला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून ही कृती करण्यात आली. तिच्याप्रमाणेच अनेकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्यांना तळ सोडण्यास सांगण्यात आले आहे. ती नक्षली तळावरून परतताच तिला क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिचा स्वॅब कोरोना चाचणीसाठी पाठवण्यिात आला आहे. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी सांगितले. तळावरून एखादा नक्षली परत आलाच तर गावकऱ्यांनी त्याची माहिती तातडीने द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. यामुळे त्या नक्षलीची चाचणी करण्यात येईल व प्रतिबंधात्मक उपाय केले जातील, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. ताप, थकवा, कफ, ही कोरोनाची लक्षणे समजली जातात.
जंगलातून एका महिलेला पकडले
गुप्त माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी सुमित्रा चेपा (३२) हिला पेडकवली गावाजवळील जंगलातून पकडले, असे पोलीस महानिरीक्षक (बस्तर) सुंदरराज पी. यांनी सांगितले. ती पीएलजीए बटालिन नंबर १ ची सक्रिय सदस्य होती. मागील १० वर्षांपासून ती नक्षलींचे काम करीत होती.