Coronavirus, Lockdown News: पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊनचे पालन करण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर जमावाचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 15:00 IST2020-04-29T14:58:53+5:302020-04-29T15:00:57+5:30
पश्चिम बंगालमधील हावडा जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे.

Coronavirus, Lockdown News: पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊनचे पालन करण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर जमावाचा हल्ला
कोलकाता - दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चाललेल्या कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या अंमलबजावणीवर भर दिला जात आहे. मात्र लॉकडाऊनची अंमलबजावणी करवून घेणाऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत. दरम्यान, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करवून घेणाऱ्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना पश्चिम बंगालमधील हावडा येथे घडली आहे. या घटनेत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठा फौजफाटा परिसरात पाठवण्यात आला आहे.
हावडामधील तिकियापारा येथे रस्त्याशेजारी भरलेल्या बाजारातील जमावाला हटवण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांवर हा हल्ला झाला. संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांना टिकियापारा पोलीस चौकीत आसरा घ्यावा लागला. त्यानंतर जमावाने पोलीस चौकीवरही दगडफेक केली. तसेच पोलिसांच्या वाहनांवर तोडफोड केली.
पश्चिम बंगालमधील हावडा जिल्हा हा कोरोनाचा हॉटस्पॉट घोषित करण्यात आला आहे. येथे राज्यातील एकूण 697 कोरोनाबाधितांपैकी 79 कोरोनाबाधित सापडले आहेत. दरम्यान, हावडामध्ये पोलिसांवर झालेला हल्ला दुर्दैवी असल्याचे तसेच जमावाने का हिंसाचार केला याची माहिती घेणार असल्याचे ममता बँनर्जी सरकारमध्ये मंत्री असलेले हावडा येथील आमदार राजीव बँनर्जी यांनी सांगितले. दरम्यान, हा हल्ला म्हणजे ममता सरकारला लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आलेल्या अपयशाचे उदाहरण असल्याचा आरोप भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी केला आहे.