CoronaVirus News: लॉकडाऊनचा जबर फटका, देशात १२.२ कोटी लोकांनी रोजगार गमावला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 10:35 IST2020-05-06T08:58:32+5:302020-05-06T10:35:44+5:30
CoronaVirus lockdown marathi news and live updates: अमेरिकेच्या तुलनेत भारतातील बेरोजगारांची संख्या चौपट; अनेक भागांत लॉकडाऊन वाढल्यानं आकडा वाढण्याची भीती

CoronaVirus News: लॉकडाऊनचा जबर फटका, देशात १२.२ कोटी लोकांनी रोजगार गमावला!
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या महिन्याभरात १२.२ कोटी लोक बेरोजगार झाल्याची आकडेवारी समोर येत आहे. खासगी क्षेत्रातल्या एका आघाडीच्या थिंक टँकनं ही माहिती दिली आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली. ४० दिवस देशात लॉकडाऊन सुरू असल्यानं या काळात हाती काम नसलेल्या लोकांची संख्या १२.२ कोटींच्या घरात गेली.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमी (सीएमआयई) या संस्थेनं लॉकडाऊनच्या काळात रोजगार नसलेल्या लोकांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. यानुसार ४० दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये १२.२ कोटी लोकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली. या कालावधीत देशातील बेरोजगारी २७.१ टक्क्यांवर पोहोचली. रोजंदारीवर असणारे मजूर, लघु उद्योगांमध्ये काम करणारे कामगार यांना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला. फेरीवाले, बांधकाम मजूर अशा असंघटित क्षेत्रातल्या लोकांवर लॉकडाऊनचा मोठा आर्थिक परिणाम झाला, असं सीएमआयईनं म्हटलं आहे.
देशातल्या बेरोजगारांचा वाढलेला आकडा अतिशय चिंताजनक असल्याचं सीएमआयईचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी म्हटलं. बेरोजगारांची संख्या केवळ आकड्यात मोजण्यासारखी परिस्थिती नाही. ही मोठी मानवी शोकांतिका आहे. कारण समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या रोजगारावर लॉकडाऊनचा खूप मोठा परिणाम झाला आहे, असं व्यास यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे.
अमेरिकेत ३ कोटी लोकांनी लॉकडाऊनच्या काळात आपण बेरोजगार झाल्याचं जाहीर केलं. तशी माहिती त्यांनी सरकारकडे दिली. भारतातल्या बेरोजगारांची संख्या अमेरिकेच्या चौपट आहे. देशातल्या अनेक भागांमधला लॉकडाऊन वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे देशातल्या बेरोजगारांचा आकडा आणखी वाढण्याची भीती सीएमआयईनं व्यक्त केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपर ह्यूमन, ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी उधळली स्तुतिसुमनं
"श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"
मोदी सरकारकडून पेट्रोलवर 10 रुपये अन् डिझेलवर 13 रुपयांच्या एक्साइज ड्युटीत वाढ