Coronavirus : राजस्थानच्या भिलवाडा शहरात डॉक्टर व कम्पाउंडरना संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 02:34 AM2020-03-22T02:34:58+5:302020-03-22T06:58:09+5:30

Coronavirus : ही बाब उघड होताच भिलवाडा जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद केल्या आहेत. सर्व दुकानेही बंद आहेत.

Coronavirus: Infection with doctors and compounders in Bhilwara, Rajasthan | Coronavirus : राजस्थानच्या भिलवाडा शहरात डॉक्टर व कम्पाउंडरना संसर्ग

Coronavirus : राजस्थानच्या भिलवाडा शहरात डॉक्टर व कम्पाउंडरना संसर्ग

Next

भिलवाडा : राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्यात कोरोना विषाणूची सहा जणांना लागण झाल्याने जिल्ह्यातील लोक धास्तावले आहेत. तेथील २७ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांना संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. त्यात तीन डॉक्टर्स व तीन कम्पाउंडर्सचा समावेश आहे.
ही बाब उघड होताच भिलवाडा जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा बंद केल्या आहेत. सर्व दुकानेही बंद आहेत. कोरोनाचा अधिक संसर्ग कोणाला होऊ नये, म्हणून राजस्थान सरकारने भिलवाडा जिल्ह्याची सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित रुग्णालयाच्या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

ज्या रुग्णालयातील डॉक्टर्स व कम्पाउंंडर्सना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, ते बृजेश बांगड मेमोरियल हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे. या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सुमारे ३५ रुग्णांपैकी काही रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे, प्रकृती चिंताजनक असलेल्या ५ ते १० गंभीर रुग्णांना अन्य रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले आहे. बांगड हॉस्पिटलच्या एक किलोमीटरच्या परिसरात संचारबंदी लागू केली आहे. या घटनेनंतर सदर हॉस्पिटल दुपारी सील करण्यात आले. हॉस्पिटलमध्ये जाण्यास आता डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही परवानगी नाही. भिलवाडा शहरातील लोकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. मात्र अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी ७ ते १0 व संध्याकाळी ५ ते रात्री ७ या काळात टप्प्याटप्प्याने सवलत देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात नव्या वाहनांना प्रवेश करायला बंदी आहे. स्थानिक लोकांना घरी परतण्यात अडचण येणार नाही. मात्र त्यांची सीमेवर तपासणी करण्यात येईल आणि मगच शहरात प्रवेश द्यायचा की नाही, हा निर्णय घेतला जाईल. हे डॉक्टर्स व कम्पाउंडर्स कोणाकोणाच्या संपर्कात आले होते, याचाही शोध घेण्यात येत आहे. त्यानंतर त्यांचीही तपासणी करण्यात येईल. (वृत्तसंस्था)

प्रकरण गंभीर का?
आतापर्यंत परदेशांतून परतलेल्यांनाच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे प्रमाण अधिक होते. या प्रकरणात मात्र सामुदायिक संसर्ग झाल्याचे लक्षात आले आहे. सामुदायिक संसर्ग अधिक धोकादायक आहे. त्यामुळे राजस्थान सरकार अधिक चिंतेत आहे.

Web Title: Coronavirus: Infection with doctors and compounders in Bhilwara, Rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.