Coronavirus: India's arms shortage in the war against Corona; Risk to increase with lack of 'PPE' kit? pnm | Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताकडे शस्त्रांचा तुटवडा; ‘पीपीई’ किटच्या कमतरतेने वाढणार धोका?

Coronavirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताकडे शस्त्रांचा तुटवडा; ‘पीपीई’ किटच्या कमतरतेने वाढणार धोका?

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे पीपीई किट उत्पादनात कमी पर्सनल प्रोटेक्टिव गियर(पीपीई) म्हणजे वैयक्तिक सुरक्षा उपकरण कच्चा माल नसल्याने पीपीई किट बनवण्यास विलंब

नवी दिल्ली – संपूर्ण देशात कोरोनाचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. दुसरीकडे सरकारी रुग्णालयातील पर्सनल प्रोटेक्टिव गियर(पीपीई) म्हणजे वैयक्तिक सुरक्षा उपकरणाचा तुटवडा भासत असल्याचं दिसून येत आहे. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागू शकतो. एचएलएल लाइफकेअरद्वारे ही सर्व उपकरणं रुग्णालयाला पुरवली जातात पण कच्च्या मालाची कमी असल्याने पीपीई पुरवठा होत नसल्याचं सांगण्यात येत आहे.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार ही बातमी आली आहे. पीपीई पर्सनल प्रोटेक्टिव गियर म्हणजे वैयक्तिक सुरक्षा उपकरण असतं. एका व्यक्तीच्या सुरक्षेसाठी या उपकरणाचा उपयोग केला जातो. पीपीई या शब्दाचा वापर वैद्यकीय क्षेत्रासाठी केला जातो. डॉक्टर्स, नर्स आणि बाकी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी कोरोनापासून वाचण्यासाठी ग्लव्स, मास्क, चष्मा आणि सूट ही उपकरणं पीपीई असतात. पीपीई किटमुळे संक्रमित व्यक्तीच्या उपचारावेळी डॉक्टर्स, नर्स आणि उर्वरित कर्मचाऱ्यांना संक्रमण होत नाही ते सुरक्षित राहतात.

अनेक ठिकाणी पीपीई किटची कमकरता असल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षेविना काम करणं भाग पडत आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करताना सुरक्षा उपकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याने अशात काम करणं धोकादायक आहे. कोरोना संक्रमण वाऱ्याच्या गतीने पसरत आहे. त्यासाठी रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवलं जातं. हा धोका लक्षात घेता डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनही केलं आहे.

पीपीईच्या तुटवड्याने काय होईल?

पटनाच्या नालंदा मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाचे डॉक्टर रवि रंजन कुमार रमन यांनी सांगितले की, जर तुम्ही सैनिकांना बंदूकीविना युद्ध लढायला सांगू शकता का? तर कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टरांनाही अशाप्रकारे काम करायला लावणं धोक्याचं आहे. ५ राज्यात १२ पेक्षा अधिक डॉक्टर्स कोरोना व्हायरसच्या संक्रमणात आले आहेत. पीपीई उपकरणाची कमी असल्याने डॉक्टरांच्या जीवाला धोका झाला आहे. जगात किती डॉक्टर्सचा कोरोनामुळे मृत्यू झाला हे सांगता येणं कठीण आहे.

एचएलएल सूत्रांच्या माहितीनुसार पीपीई किट उपकरण बनवण्यासाठी लघू आणि मध्यम उद्योग कच्चा माल तयार करतात. तो एचएलएलला पाठवतात. अनेक क्षेत्रातील उपकरणांना जोडून ही किट तयार केली जाते. लॉकडाऊनमुळे या क्षेत्राकडून उपकरणं येण्यास उशीर होत आहेत. त्यामुळे पीपीई किट बनवण्यात विलंब होत आहे. कच्च्या मालाचा तुटवडा आणि उत्पादन कमी होत असल्याने पीपीईचं संकट उभं राहिलं आहे.

 

Web Title: Coronavirus: India's arms shortage in the war against Corona; Risk to increase with lack of 'PPE' kit? pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.