CoronaVirus News: रशियन लस मिळविण्यासाठी भारतीयांना करावी लागणार प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 07:44 IST2020-08-12T03:59:31+5:302020-08-12T07:44:42+5:30
केंद्रीय समितीची आज बैठक; लसीबाबतच्या घडामोडींवर भारताचे लक्ष

CoronaVirus News: रशियन लस मिळविण्यासाठी भारतीयांना करावी लागणार प्रतीक्षा
नवी दिल्ली : अवघ्या जगाला कवेत घेणाऱ्या कोरोनाला रोखण्याची आशा रशियन लसीने पल्लवित केली असली तरी भारतीयांना मात्र त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल. केंद्र सरकारने लस विकसित करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीला परदेशी लस स्वदेशात आणण्यासंबंधी निर्णयाचे अधिकार असतात व याच समितीची बैठक बुधवारी होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली. रशियन लसीचा थेट उल्लेख करण्याचे त्यांनी टाळले. मात्र, देशांतर्गत व देशाबाहेर लस तयार करणाºया सर्व कार्यक्रमांवर भारताचे लक्ष असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नीती आयोगाचे सदस्य वी.के. पॉल या समितीचे सदस्य आहेत. भारतात लस विकसित, वितरित करण्याचे सर्व अधिकार याच समितीला आहेत. भारतीयांसाठी कोणती लस निवडावी, लसीकरण कार्यक्रम कधी जाहीर करावा, लस कुणाला द्यावी, त्यासाठी लागणारी वैद्यकीय पायाभूत सुविधा कशा व कुठे उभाराव्यात तसेच किती निधी खर्च करायचा असे महत्त्वाचे अधिकार या समितीला असल्याचे राजेश भूषण यांनी नमूद केले. रशियाने कोरोनावर लस विकसित केल्याची घोषणा करताच जगभरात वेगवेगळी प्रतिक्रिया उमटली.
ऑक्सफर्डच्या मदतीने भारतातही लस तयार केली जात आहे. त्याची माहिती देताना राजेश भूषण यांनी कालमर्यादेचा उल्लेख करणे टाळले. लसीकरण विकास कार्यक्रम समितीची बुधवारी महत्त्वाची बैठक आहे, यावरच राजेश भूषण यांनी भर दिला.
दरम्यान, आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणतीही लस स्वीकारणे, तसा कार्यक्रम भारतात राबवणे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे रशियन लसीवर भारत प्रतिक्रिया देणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे मतही महत्त्वाचे ठरेल. मात्र, भारतातही कोव्हॅक्सिनच्या मानवी चाचण्यांचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही. त्यामुळे काही महिन्यांत भारतीय लस तयार होण्याची शक्यता नाही.
जागतिक आरोग्य संघटना रशियाच्या संपर्कात
जागतिक आरोग्य संघटनेने मात्र अद्याप रशियन लस मान्य अथवा अमान्य केली नाही. आम्ही रशियन आरोग्य व्यवस्थापनाच्या संपर्कात आहोत, त्यांच्याकडून पुरेशी आकडेवारी मिळाली नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते, तर रशियन प्रसारमाध्यमांच्या मते विकसित केलेल्या सर्वांना डोस देण्यात आला असून, ताप वगळता इतर कोणतीही लक्षणे त्यांच्यात नसल्याने लस सुरक्षेची ग्वाही देते.