CoronaVirus Indian Railways Southern zone develops social distancing device | CoronaVirus News: छोटंसं यंत्र करणार मोठी कामगिरी; बजावणार सोशल डिस्टन्सिंग राखण्याची जबाबदारी

CoronaVirus News: छोटंसं यंत्र करणार मोठी कामगिरी; बजावणार सोशल डिस्टन्सिंग राखण्याची जबाबदारी

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. चाचण्या वाढवणं आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणं यामुळेच कोरोनाचा फैलाव रोखणं शक्य असल्याचं आतापर्यंतच्या संशोधनांमधून समोर आलं आहे. त्यामुळे आता रेल्वेचे कर्मचारी एका खास यंत्राचा वापर करणार आहेत. हे यंत्र कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग राखण्यास मदत करेल. 

रेल्वेच्या दक्षिण विभागातल्या थिरुअनंतपुरम डिव्हिजननं एक खास यंत्र तयार केलं आहे. हे यंत्र कर्मचाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची आठवण करून देईल. रेल्वे कर्मचाऱ्यांचा विचार करून त्यांच्या सुरक्षेसाठी हे यंत्र तयार करण्यात आल्याची माहिती दक्षिण रेल्वेकडून देण्यात आली. या यंत्राचा वापर करणारे दोन किंवा त्याहून जास्त कर्मचारी एकमेकांपासून ते दोन-तीन मीटरवर आल्यास यंत्रातून अलार्म वाजेल. कर्मचारी एकमेकांपासून तीन मीटरपेक्षा जास्त अंतर दूर जाईपर्यंत यंत्रातून येणारा अलार्म सुरूच राहील.

सोशल डिस्टन्सिंग राखलं जाईल याची काळजी घेणाऱ्या यंत्र फारसं महाग नाही. या यंत्राची किंमत ८०० रुपयांपेक्षा कमी असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे. एकदा बॅटरी संपल्यानंतर हे यंत्र चार्जरच्या मदतीनं पुन्हा चार्ज करता येतं. एकदा चार्ज केल्यावर हे यंत्र १२ तासांपेक्षा जास्त वेळ काम करतं. एनआरएफ२४एल०१ ट्रान्सिव्हर, अर्ड्युनो प्रो-मिनीच्या मदतीनं या यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची आठवण करून देणारं, ते पाळलं जाईल याची काळजी घेणारं यंत्र वापरण्यास अतिशय सोपं आहे. आपल्या आसपास सक्रिय असलेल्या यंत्रांची माहिती घेऊन या यंत्रातून अलार्म वाजतो. या यंत्राची रेंज दोन-तीन मीटर इतकी आहे. या यंत्रामध्ये रेडिओ फ्रिक्वन्सी सिग्नल यंत्रणा वापरण्यात आली आहे. अतिशय स्वस्त असणाऱ्या या यंत्राचं वजन केवळ ३० ग्राम इतकं आहे.

रेल्वेच्या कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या यंत्रात सिंगल चिप ट्रान्सिव्हरचा वापर करण्यात आला आहे. यंत्राकडून वापरण्यात येणारा करंट अतिशय कमी आहे. यामध्ये पॉवर डाऊन आणि स्टँडबायचे पर्याय उपलब्ध असल्यानं बॅटरी वाचवण्यास मदत होते. 

आकारानं लहान असलेल्या, पण मोठी कामगिरी बजावणाऱ्या यंत्रात अर्ड्युनो प्रो-मिनी मायक्रोकंट्रोलरचा वापर करण्यात आला आहे. त्याला १४ डिजिटल इनपुट/आऊटपुट पिन्स आहेत. याशिवाय रिसेट बटन, सहा ऍनालॉग इनपुट्स देण्यात आले आहेत. प्रो मिनीच्या दोन आवृत्ती आहेत. त्यातील एक ३.३ व्होल्ट आणि ८ मेगाहर्ट्झ, तर दुसरी ५ व्होल्ट आणि १६ मेगाहर्ट्झवर चालते.

यंत्रामध्ये ७ व्होल्ट ५०० मिलिऍम्पेर लिथियम पॉलिमर बॅटरी असून ती लिपो रिचार्जेबल आहे. लिपो किंवा लिपोली म्हणून ओळखली जाणारी ही बॅटरी अतिशय हलकी आणि शक्तीशाली असते. या बॅटरीची क्षमता ५०० मिलिऍम्पेर इतकी आहे.

मजुरांना रोजगार देण्यासाठी विद्यार्थ्याचे अ‍ॅप; स्थलांतरितांना मदतीचा हात
स्थलांतरित मजुरांना काम देण्यासाठी उद्योजकांना त्यांच्याशी संपर्क साधता यावा याकरिता नॉयडामधील अक्षत मित्तल या १७ वर्षे वयाच्या विद्यार्थ्याने भारत श्रमिक नावाचे अ‍ॅप तयार केले आहे. कोरोना साथीमुळे केंद्र सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यावर लाखो स्थलांतरित मजूर विविध राज्यांत अडकून पडले होते. गावी परतताना मजुरांचे विलक्षण हाल झाले होते.

स्थलांतरित मजूर गावी परतले असले तरी त्यातील बहुतेकांच्या हातात रोजगार नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा शहरात कामधंद्यासाठी परतण्याची इच्छा आहे. अशा मजुरांना काम देऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांना त्यांच्याशी भारत श्रमिक अ‍ॅपच्या माध्यमातूनही संपर्क साधता येणार आहे. त्यासाठी अक्षत मित्तल याने भारतश्रमिक डॉट इन ही वेबसाइट वडील आशिष मित्तल यांच्या मदतीने सुरू केलीे. रोजगाराच्या शोधात असलेल्या स्थलांतरित मजुरांनी आपल्या कौशल्याची माहिती घरचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आदी तपशील या वेबसाइटवर द्यायचा आहे. अनेक स्थलांतरित मजुरांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी अक्षत मित्तल याने एक हेल्पलाइनही सुरू केली आहे. त्यावर या मजुरांनी दिलेल्या माहितीनुसार तो तपशील या वेबसाइटवर झळकविण्यात येईल. स्थलांतरित मजुरांकडील कौशल्य व इतर तपशील उद्योजक भारतश्रमिक डॉट इन या वेबसाइटवर किंवा अ‍ॅपवर पाहून त्यांना आवश्यक वाटणाऱ्या मजुरांना नोकऱ्या देऊ शकतील.

(‘फेसबुक’ने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा
प्रभाव नाही.)

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CoronaVirus Indian Railways Southern zone develops social distancing device

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.