Coronavirus India: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमागे XBB.1.16 व्हेरिएंट, किती धोकादायक? WHO ने म्हटले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 18:14 IST2023-03-30T18:14:05+5:302023-03-30T18:14:13+5:30
Coronavirus XBB.1.16: जगभरात XBB.1.16 व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे भारतात आहेत.

Coronavirus India: कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमागे XBB.1.16 व्हेरिएंट, किती धोकादायक? WHO ने म्हटले...
WHO On XBB.1.16 Variant:भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. 30 मार्च रोजी आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या चोवीस तासात 3016 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामागे कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XBB.1.16 कारण असल्याचे मानले जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) XBB.1.16 प्रकार किती धोकादायक आहे, याची माहिती दिली आहे.
जगभरात XBB.1.16 व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे भारतात आहेत. तज्ज्ञांच्या अभ्यासानुसार, कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट सध्या वातावरणात उपस्थित आहे आणि याच्यामध्येच जेनेटिक म्यूटेशन होत आहे. त्यातूनच हा नवीन XBB.1.16 व्हेरिएंट समोर आला आहे. भारतात या व्हेरिएंटने XBB1.1.5 व्हेरिएंटची जागा घेतली आहे.
XBB.1.16 किती धोकादायक?
22 देशांमधून XBB.1.16 व्हेरिएंटचे 800 केस सीक्वेन्स बाहेर आले आहेत. XBB.1.16 प्रकारात संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याचेही अभ्यासातून समोर आले आहे. तरीदेखील, हा व्हेरिएंट अद्याप धोकादायक झालेला नाही. असे असतानाही WHO या प्रकारावर लक्ष ठेवून आहे. यासोबतच या प्रकारावर सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
WHO काय म्हणाले?
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, कोविड-19 महामारी चिंतेचे कारण आहे, कारण ही महामारी अद्याप संपलेली नाही. अजूनही व्हायरस पसरत आहे. याचा प्रभाव पूर्वीपेक्षा कमी आहे, पण काळजी घेणे महत्वाचे आहे. आता परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली आहे आणि या महामारीमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही बरीच कमी झाली आहे. परंतु अजूनही जगात दर आठवड्याला सुमारे 5-10 हजार लोकांचा मृत्यू होत आहे. यामुळे सतत देखरेख करणे आवश्यक आहे.