coronavirus : भारत कोरोनाविरोधातील लढाई जिंकणार, ग्लोबल लीडर बनणार, काँग्रेस नेत्याकडून मोदी सरकारचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 16:43 IST2020-04-27T16:43:27+5:302020-04-27T16:43:46+5:30
कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येत आहे.

coronavirus : भारत कोरोनाविरोधातील लढाई जिंकणार, ग्लोबल लीडर बनणार, काँग्रेस नेत्याकडून मोदी सरकारचे कौतुक
नवी दिल्ली - देशात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे शासन आणि प्रशासनाच्या पातळीवर चिंतेचे वातावरण आहे. त्यातच कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना अपुऱ्या असल्याची टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येत आहे. काँग्रेसचे इतर नेतेही सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीररंजन चौधरी यांनी मात्र कोरोनाला रोखण्यासाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. भारत सरकार आणि येथील वैद्यकीय कर्मचारी जगातील इतर भागांच्या तुलनेत खूप चांगले काम करत आहेत. जर कोरोनाच्या संकटातून भारत बाहेर पडला तर हा देश एक ग्लोबल लीडर बनू शकतो, असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला आहे.
अधीररंजन चौधरी म्हणाले की, सुमारे 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात सरकार, राज्य सरकारे, डॉक्टर आणि इतर संस्थांनी चांगले काम केले आहे. जेव्हा आम्ही अमेरिका, युरोपला पाहतो तेव्हा आपण त्यांच्यापेक्षा खूप पुढे गेल्याचे जाणवते. आता जर आपण या संधीचा योग्य पद्धतीने वापर केला तर भारत खूप पुढे निघून जाईल. ग्लोबल लीडर बनेल.'
दरम्यान, अधीररंजन चौधरी यांनी कौतुक केले असले तरी काँग्रेसने कोरोनाविरोधात लढण्यासाठी सरकारची तयारी अपुरी पडल्याची टीका वेळोवेळी केली आहे. सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लॉकडाऊनची तुलना नोटाबंदीशी केली होती.
सोनिया गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात MSME क्षेत्राचा उल्लेख केला होता. या क्षेत्राचा सकल राष्ट्रीय एक तृतीयांश इतका वाटा आहे. तसेच त्यात 11 कोटी लोक आहेत. दरम्यान, दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी हेसुध्दा लॉकडाऊनमुळे कोरोनाला केवळ अटकाव येईल तो संपणार नाही. कोरोनाला रोखण्यासाठी अधिकाधिक प्रमाणात चाचण्या होणे आवश्यक आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.