Coronavirus: भारताने UAEला 55 लाख Hydroxychloroquine पाठविले, आणखी 55 देश प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 15:53 IST2020-04-19T15:41:34+5:302020-04-19T15:53:49+5:30
Coronavirus: विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि त्याची विक्री थांबविली होती.

Coronavirus: भारताने UAEला 55 लाख Hydroxychloroquine पाठविले, आणखी 55 देश प्रतीक्षेत
नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. कोरोना संकटाचा सामना जगातील सर्वच देश करत आहे. या कोरोना संकटात भारताने दुबईला मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. भारतातील संयुक्त अरब अमिरातच्या (यूएई) दूतावासने म्हटले आहे की, "यूएईमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधे पाठविण्यास भारताने सहमती दर्शविली आहे. या औषधांचा उपयोग कोरोना बाधित रूग्णांवर उपचार करण्यासाठी केला जाईल.
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवर बंदी घातली होती आणि त्याची विक्री थांबविली होती. मात्र, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनावर संभाव्य प्रभावी उपचार म्हणून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचे वापर करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानंतर भारताने या औषधांचा पुरवठा वाढविण्याचा निर्णय घेतला. अमेरिकेतील अन्न आणि औषधे प्रशासनाने न्यूयॉर्कमधील 1500 हून अधिक रुग्णांवर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची चाचणी घेत आहे.
भारताने आपल्या निर्यातीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्यानंतर गेल्या काही दिवसांत या औषधाची मागणी झपाट्याने वाढली आहे. सध्या कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या 55 देशांना भारत मदत आणि व्यावसायिक आधारावर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पुरविण्याच्या तयारीत आहे. भारताने आतापर्यंत हे औषध अमेरिका, सेशेल्स आणि मॉरिशस येथे पाठविले आहे. याशिवाय, ही औषधे अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश, नेपाळ, मालदीव, श्रीलंका आणि म्यानमार येथे पाठविली जात आहेत.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रसंघाचे (यूएन) सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या देशांना मदत करणाऱ्या भारतासह इतर देशांना सलाम केला आहे. अँटोनियो गुटेरेस यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी शुक्रवारी सांगितले की, " कोरोनाविरुद्धच्या लढ्यात सरचिटणीस यांनी एकजुटतेचे आवाहन केले आहे. जे देश इतर देशांना मदत करण्याच्या स्थितीत आहेत. त्यांनी मदत केली पाहिजे. आम्ही भारतासह अशा देशांना सलाम करतो, ज्यांनी इतर देशांची मदत केली आहे."