Coronavirus: जगातील दर दहा लाख लोकांमागे भारतात सर्वात कमी कोरोना बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:48 IST2020-10-15T02:14:00+5:302020-10-15T06:48:37+5:30
एकूण रुग्णसंख्या ७२ लाखांवर; कोरोना चाचण्यांचा पल्ला ९ कोटींवर

Coronavirus: जगातील दर दहा लाख लोकांमागे भारतात सर्वात कमी कोरोना बळी
नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर असला तरी, दर दहा लाख लोकांमागे देशात फक्त ७९ जण कोरोनामुळे मरण पावतात. हे जगातील सर्वात कमी प्रमाण आहे. भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या बुधवारी ७२ लाख ३९ हजारांवर पोहोचली असून, आजवर झालेल्या कोरोना चाचण्यांनी ९ कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
देशात बुधवारी कोरोनाचे ६३,५०९ नवे रुग्ण आढळून आले असून, या आजाराच्या रुग्णांची एकूण संख्या ७२,३९,३८९ झाली आहे, तर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या ६३ लाखांवर पोहोचली आहे. बरे होणाºयांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ८७.०५ टक्के आहे. कोरोनामुळे बुधवारी आणखी ७३० जण मरण पावल्याने बळींची एकूण संख्या १,१०,५८६ झाली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या सलग सहाव्या दिवशी ९ लाखांपेक्षा कमी आहे. सध्या देशात ८,२६,८७८ कोरोना रुग्ण उपचार घेत असून, बरे झालेल्यांची संख्या ६३,०१,९२७ आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.५३ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, १३ आॅक्टोबर रोजी ११,४५,०१५ कोरोना चाचण्या पार पडल्या. या चाचण्यांची एकूण संख्या ९,००,९०,१२२ झाली आहे.
२० राज्यांत संसर्ग होण्याचे प्रमाण राष्ट्रीय स्तराहून कमी
८.१९ टक्के कोरोनाचा संसर्ग होण्याचे राष्ट्रीय स्तरावरील सरासरी प्रमाण आहे. त्यापेक्षा २० हून अधिक राज्ये, केंद्रशासित प्रदेशांत संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामध्ये बिहार, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, हरयाणा, ओदिशा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, तेलंगणा, पश्चिम बंगाल आदींचा समावेश आहे.
मुंबईतील दोघांसह तीन जणांना झाला पुन्हा संसर्ग
कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा त्या विषाणूचा संसर्ग झालेले तीन रुग्ण इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने आढळून आले आहेत. त्यातील दोन मुंबईतील व एक अहमदाबादमधील आहे. कोरोना विषाणूचा बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा संसर्ग होऊ शकतो, असे एका पाहणीत नुकतेच आढळून आले होते.