coronavirus: देशात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जुलैैपासून वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 04:07 AM2020-07-08T04:07:42+5:302020-07-08T07:36:26+5:30

भारतात जूनअखेरपर्यंत झालेल्या कोरोना मृत्यूंपैकी सुमारे ७५ टक्के मृत्यू पूर्ण ‘लॉकडाऊन’चे कडक निर्बंध शिथिल करून १ जूनपासून ‘अनलॉक-१’चा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर जून महिन्यातच झाले, असे आकडेवारीच्या विश्लेषणावरून दिसते.

coronavirus: increase in the number of patients recovering in the country since July | coronavirus: देशात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जुलैैपासून वाढ

coronavirus: देशात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत जुलैैपासून वाढ

Next

नवी दिल्ली : भारतात जूनच्या सुरुवातीस ‘अ‍ॅक्टिव’ रुग्ण (९७,००८) बरे झालेल्या रुग्णांहून (९५,७४४) जास्त होते. मात्र जूनच्या अखेरपर्यंत ‘अ‍ॅक्टिव’ रुग्णांहून बरे होणारे रुग्ण वाढू लागले व महिनाअखेरीस बरे झालेले रुग्ण ‘अ‍ॅक्टिव’ रुग्णांहून १.२ लाखांनी जास्त झाले. हे एक आशादायक चित्र म्हणावे लागेल.

भारतात जूनअखेरपर्यंत झालेल्या कोरोना मृत्यूंपैकी सुमारे ७५ टक्के मृत्यू पूर्ण ‘लॉकडाऊन’चे कडक निर्बंध शिथिल करून १ जूनपासून ‘अनलॉक-१’चा पहिला टप्पा सुरू झाल्यानंतर जून महिन्यातच झाले, असे आकडेवारीच्या विश्लेषणावरून दिसते. मात्र जूननंतर हे निराशाजनक चित्र आशादायी होत गेले.

वाढत्या चाचण्या, घरोघरी केलेले व्यापक सर्वेक्षण व कोरोना रुग्णसंख्या अधिक असलेले भाग पूर्णपणे बंद करणे यामुळे हे शक्य झाले. १३ मार्च रोजी देशात कोरोनाने पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला. तेव्हापासून मेअखेर ‘लॉकडाऊन’  लागू असताना मृत्यूंची संख्या ५,५०० वर पोहोचली. मात्र १ जूनपासून ‘अनलॉक’चा पहिला टप्पा सुरु झाला आणि मृत्यूंची संख्या वाढू लागली. १ जून रोजी ५,६०६ असलेली मृत्यूंची संख्या जूनअखेर दुपटीने म्हणजे ११,८०३ ने वाढून १७,४०९वर पोहोचली.

जूनमध्ये फक्त कोरोनाचे मृत्यूच फक्त वाढले असे नाही. नव्याने झालेले संसर्ग व बरे न झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत गेली. जूनच्या सुरुवातीस ९७,००८ एवढे असलेले ‘अ‍ॅक्टिव’ रुग्ण जूनअखेर वाढून २ लाख २० हजार ४७८वर पोहोचले. मार्चपासूनच्या आकडेवारीचा विचार केला तर देशातील आत्तापर्यंतच्या एकूण रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण एकट्या जूनमध्ये वाढल्याचे दिसते.

Web Title: coronavirus: increase in the number of patients recovering in the country since July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.