coronavirus: लॉकडाऊनच्या अफवांकडे दुर्लक्ष करा, अनलॉक-२ चा आराखडा तयार करा, मोदींचा राज्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 21:09 IST2020-06-17T21:08:13+5:302020-06-17T21:09:42+5:30
एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुसरीकडे लॉकडाऊन वाढवण्याबाबत सुरू असलेल्या अफवा या पार्श्वभूमीवर आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक-२ बाबत मोठे संकेत दिले आहेत.

coronavirus: लॉकडाऊनच्या अफवांकडे दुर्लक्ष करा, अनलॉक-२ चा आराखडा तयार करा, मोदींचा राज्यांना सल्ला
नवी दिल्ली - जून महिन्याच्या सुरुवातीपासून देशातील लॉकडाऊन हटवून हळूहळू देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र अनलॉक-१ ला सुरुवात झाल्यापासून देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण आणि दुसरीकडे लॉकडाऊन वाढवण्याबाबत सुरू असलेल्या अफवा या पार्श्वभूमीवर आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनलॉक-२ बाबत मोठे संकेत दिले आहेत.
देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सलग दोन दिवस चाललेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊनच्या अफवांकडे दुर्लक्ष करून अनलॉक-२ बाबत योजना तयार करण्याची सूचना विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिली आहे. यावेळी मोदींनी देशात सध्या उपलब्ध असलेल्या टेस्टिंगच्या क्षमतेचा आणि टेस्टिंग वाढवण्याचा सल्ला राज्यांना दिला. तसेच आर्थिक व्यवहारांना गती देण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच राज्यांनी पायाभूत सुविधांची निर्मिती आणि बांधकामासंबंधीच्या कामांना गती द्यावी अशा सल्लाही मोदींनी दिला.
दरम्यान, देशातील काही शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचेही त्यांनी मान्य केले. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अनलॉक-१ नंतरची ही आपली पहिलीच भेट आहे. सध्याच्या घडीला देशातील काही मोठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काही शहरांमध्ये गर्दी, लहान घरे , गल्लीबोळांमध्ये फिरताना फिजिकल डिस्टंसिंग बाळगण्यात येणाऱ्या अडचणी तसेच दररोज हजारो लोकांची होणारी ये जा यामुळे कोरोनाविरोधातील लढाईला आव्हानात्मक बनवले आहे.
मात्र असे असले तरी देशवासियांचा संयम आणि विविध ठिकाणी प्रशासनाने दाखवलेली तत्परता व आमच्या कोविड योद्ध्यांनी दाखवलेला समर्पणभाव यामुळे आम्ही परिस्थिती नियंत्रणात ठेवी शकलो आहोत. कोरोनाबाधितांचा वेळीच घेण्यात येत असलेला शोध, उपचार यामुळे आपल्याकडील बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिलासादायक बाब म्हणजे आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरजही खूप कमी रुग्णांना भासत आहे.