ड्युटी फर्स्ट! वडिलांच्या निधनानंतर IAS अधिकारी दोन दिवसांतच कामावर रुजू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 15:31 IST2020-03-18T15:31:11+5:302020-03-18T15:31:56+5:30
भुवनेश्वरमध्ये तैनात असलेला आयएएस अधिकारी निकुंज धल (Nikunja Dhal) यानंसुद्धा कर्तव्याचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे.

ड्युटी फर्स्ट! वडिलांच्या निधनानंतर IAS अधिकारी दोन दिवसांतच कामावर रुजू
भुवनेश्वरः भारतासह जगभरातल्या अनेक देशातील नागरिक जीवघेण्या कोरोना व्हायरसशी लढत आहेत. भारतात आतापर्यंत 147 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सरकारी रुग्णालयातील डॉक्टरसह सरकारी अधिकारी या कठीण प्रसंगात लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. भुवनेश्वरमध्ये तैनात असलेला आयएएस अधिकारी निकुंज धल (Nikunja Dhal) यानंसुद्धा कर्तव्याचं अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे.
चित्रपटात बरेच हिरो आपण पाहतो, परंतु निकुंज हा खऱ्या आयुष्यातला हिरो आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचं निधन झालं, निकुंज यानं वडिलांवर अंत्यसंस्कार केले आणि 24 तासांच्या आता तो पुन्हा कामावर रुजू झाला. निकुंज धल हा सध्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागात सचिवपदावर कार्यरत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर लागलीच दुसऱ्या दिवशी तो कामावर हजर झालाय, जेणेकरून कोरोनाग्रस्त रुग्णाची त्याला सेवा करता येईल. निकुंज याच्या या पावलाचं त्यांच्या कार्यालय आणि सोशल मीडियावरून कौतुक करण्यात येत आहे. जनता आता त्यांच्या कर्तव्यनिष्ठेचंही कौतुक करत आहे.
ओडिशात कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. कोरोनाचा संसर्ग झालेली ही व्यक्ती शोधकर्ता असून, गेल्या काही दिवसांपूर्वीच इटलीहून ओडिशात आली होती. 33 वर्षीय हा रुग्ण इटलीहून मार्च महिन्यात दिल्लीला परतला आणि 12 मार्चला रेल्वेने भुवनेश्वरला पोहोचला. कोरोना विषाणूच्या घटनांबाबत ओडिशा सरकारचे मुख्य प्रवक्ते सुब्रतो बागची यांनी पत्रकारांना सांगितले की, रुग्णाला भुवनेश्वरच्या कॅपिटल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे आणि आजपर्यंत त्याच्याकडे कोणतीही गंभीर लक्षणे दिसली नाहीत. त्याच्या कुटुंबातील सदस्यांना वेगळं ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ओडिशा सरकारनं सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अशा परिस्थितीशी सामना करण्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.