coronavirus: मास्क न वापरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावा, हायकोर्टाचे सक्त आदेश
By बाळकृष्ण परब | Updated: November 28, 2020 19:26 IST2020-11-28T19:24:59+5:302020-11-28T19:26:37+5:30
coronavirus News : जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही तोपर्यंत मास्क हाच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे सरकारकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र अनेकजणांवर सरकारच्या या आवाहनाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही

coronavirus: मास्क न वापरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावा, हायकोर्टाचे सक्त आदेश
अहमदाबाद - देशातील कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असले तरी कोरोनाबाबत सर्वसामान्यांमध्ये असलेले गांभीर्य कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकजण मास्क न लावता फिरत असल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुजरात हायकोर्टाने आज सक्त आदेश दिले आहेत. जे लोक मास्क न लावता फिरतात त्यांच्याकडून दंड वसूल करा. तसेच दंडात्मक कारवाई करूनही लोक सुधरत नसतील तक त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी पाठवा, असे कठोर आदेश गुजरातउच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.
जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही तोपर्यंत मास्क हाच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे सरकारकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र अनेकजणांवर सरकारच्या या आवाहनाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही आहे. अनेकजण मास्क न लावता फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.
कोरोनाचा हा वाढचा संसर्ग विचारात घेऊन गुजरात हायकोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने सांगितले की, जे लोक मास्कशिवाय फिरताना सापडतील त्यांना कोविड कम्युनिटी सेंटरमध्ये नॉन मेडिकल विभारात १० ते १५ दिवस काम करण्याची जबाबदारी द्या. जर अशा लोकांना कोविड कम्युनिटी सर्व्हिस सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी पाठवल्यास लोक सतर्क होऊन दिवसभर मास्क लावतील. तसेच राज्य सरकारने कोरोनाच्या परिस्थितीबाबत उत्तर द्यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
गुजरात हायकोर्टात मास्कबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने हे आदेश दिले. या सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने गुजरात सरकारला राज्यातील कोरोनाच्या संसर्गाबाबत माहिती विचारली. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे, अशी विचारणाही कोर्टाने केली. त्यावर उत्तर देताना राज्य सरकारने सांगितले की, राज्यात राजकीय कार्यक्रमांवर बंदी आणण्यात आली आहे. विवाहामध्ये केवळ १०० आणि अंत्यसंस्कारांसाठी केवळ ५० जणांना उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.