Delta Plus Variant : केंद्रानं जारी केल्या गाइडलाइन्स, 'टीटीव्ही'वर भर; 8 राज्यांतील 'या' 11 जिल्ह्यांना दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 21:15 IST2021-06-26T21:14:31+5:302021-06-26T21:15:43+5:30
CoronaVirus Delta Plus Variant: कोरोना महामारीचा कहर नेमका केव्हा थांबणार, हे आज तरी कुणीही सांगू शकत नाही. या व्हायरसच्या नव-नव्या रुपांनी मानव जातीला संकटात टाकले आहे.

Delta Plus Variant : केंद्रानं जारी केल्या गाइडलाइन्स, 'टीटीव्ही'वर भर; 8 राज्यांतील 'या' 11 जिल्ह्यांना दिला इशारा
नवी दिल्ली - देश अद्यापही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचाच सामना करत आहे. असे असानाच डेल्टा प्लसच्या रुपात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात, केंद्र सरकारने राज्यांना सावध करायला सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 8 राज्यांतील मुख्य सचिवांना पत्र लिहून डेल्टा प्लसचा सामना करण्यासाठी तयारीत राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि व्हॅक्सीनेशन (टीटीव्ही) या तीन गोष्टींवर विषेश भर देण्यात आला आहे. (CoronaVirus Delta plus center issued guidelines emphasis on ttv warned 11 districts)
कोरोना महामारीचा कहर नेमका केव्हा थांबणार, हे आज तरी कुणीही सांगू शकत नाही. या व्हायरसच्या नव-नव्या रुपांनी मानव जातीला संकटात टाकले आहे. आता कोरोनाचे डेल्टा प्लस नावाचे संकट उंबरठ्यावर आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सावध झाले आहे. केंद्राने राज्यांनाही सतर्क केले आहे. आतापर्यंत देशातील 12 राज्यांत डेल्टा प्लसचे 52 रुग्ण समोर आले आहेत.
'या' 8 राज्यांना आणि 11 जिल्ह्यांना देण्यात आलाय इशारा -
आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, जम्मू-काश्मीर, पंजाब, कर्नाटक, राजस्थान आणि तामिळनाडू या आठ रांज्यांतील 11 जिल्ह्यांना केंद्र सरकारने इशारा दिला आहे. यात, तामिळनाडूतील मदुरई, कांचीपुरम आणि चेन्नई, राजस्थानातील बिकानेर, कर्नाटकातील म्हैसूर, पंजाबमधील पटियाला आणि लुधियाना, जम्मू काश्मीरमधील रियासी, हरियाणातील फरिदाबाद, गुजरातमधील सूरत तथा आंध्र प्रदेशातील तिरुपती या जिल्ह्यांचा समावेश आहे.
यापूर्वी, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळला देण्यात आला होता इशारा -
दोन दिवसांपूर्वीच आरोग्य मंत्रालयाने मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांनाही इशारा दिला होता. या राज्यांना डेल्टा प्लसपासून सतर्क रहायला सांगितले होते.
राज्य सरकारांनी करावा 'हा' उपाय -
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे, की नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. याचा सामना करण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि लसीकरणाचा वेग वाढवावा. याशिवाय ज्या ठिकाणी डेल्टा प्लसचा रुग्ण आढेळेल, त्या ठिकाणी स्ट्रिक्ट कंटेनमेन्टची व्यवस्था करावी.
गाइडलाइन्समध्ये 'हे' उपायही सांगितले -
- गर्दी रोखणे, लोकांच्या एकत्रित येण्यावर आणि रहदारीवर नियंत्रण आणणे.
- जेथे डेल्टा प्लसचा रुग्ण आढळेल, तेथे तत्काळ कंटेनमेंट झोन करावा.
- निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
- संक्रमितांचे नमुने तत्काल जीनोम अनुक्रमणासाठी पाठवावे.