coronavirus: देशात रुग्णसंख्या घटली; मृत्यूदर केवळ १.४९ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 04:56 AM2020-10-30T04:56:06+5:302020-10-30T07:13:48+5:30

CoronaVirus Positive News : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८०,४०,२०३ आहे. या आजारामुळे गुरुवारी आणखी ५१७ जण मरण पावले असून, बळींचा एकूण आकडा १,२०,५२७ वर पोहोचला आहे.

coronavirus: Decreased morbidity in the country; Mortality rate is only 1.49 percent | coronavirus: देशात रुग्णसंख्या घटली; मृत्यूदर केवळ १.४९ टक्के

coronavirus: देशात रुग्णसंख्या घटली; मृत्यूदर केवळ १.४९ टक्के

Next

नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी कोरोनाचे ४९,८८१ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे या साथीच्या रुग्णांची एकूण संख्या ८० लाखांहून अधिक झाली आहे, तर ७३.१५ लाख लोक बरे झाले असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ९०.९९ टक्के आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोरोना रुग्णांची एकूण संख्या ८०,४०,२०३ आहे. या आजारामुळे गुरुवारी आणखी ५१७ जण मरण पावले असून, बळींचा एकूण आकडा १,२०,५२७ वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.४९ टक्के इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. सध्या ६०,३,६८७ कोरोना रुग्ण उपचार घेत असून, त्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या ७.५ टक्के आहे.

देशात कोरोना रुग्णांची ७० लाख असलेली संख्या  त्यानंतर अवघ्या १८ दिवसांत ८० लाखांवर पोहोचली. कोरोना बळींची संख्या कर्नाटकामध्ये ११,०४६, तामिळनाडूत ११,०१८, उत्तर प्रदेशात ६,९५८, आंध्र प्रदेशमध्ये ६,६४३, पश्चिम बंगालमध्ये ६,६६४, दिल्लीत ६,३९६, पंजाबमध्ये ४,१५८, गुजरातमध्ये ३,७०१ इतकी आहे.

जगातील कोरोना रुग्णांची सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या देशांत अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे. तिथे ९१ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतातील कोरोना रुग्णांची संख्या अमेरिकेपेक्षा ११ लाखांनी कमी आहे. तिसऱ्या क्रमांकावरील ब्राझीलमध्ये ५४ लाखांहून जास्त कोरोना रुग्ण आहेत. 

सहा आठवड्यांपासून रोज ११ लाख कोरोना चाचण्या
गेल्या सहा आठवड्यांपासून देशात दररोज सरासरी ११ लाख कोरोना चाचण्या पार पडत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या माहितीनुसार २८ ऑक्टोबर रोजी १०,७५,७६० कोरोना चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत केलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या १०,६५,६३,४४० वर पोहोचली आहे. 

युरोपात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी अनेक देशांत लॉकडाऊन 
युरोपमध्ये कोरानाची दुसरी लाट येत असतानाच सरकारने साथ रोखण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. जर्मनी आणि इतर काही देशांनी कठोर प्रतिबंध लागू केले आहेत. 
जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की, मागील आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांमध्ये जवळपास ४० टक्के वाढ झाली आहे. फ्रान्स, स्पेन, ब्रिटन, नेदरलँड आणि रशिया या देशांतील रुग्णसंख्या वाढली आहे. 
जर्मनीत रुग्ण वाढल्यानंतर रेस्टॉरंट, बार आणि कॅफे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारने १० बिलियन युरोचा प्रस्ताव दिला आहे. 
दहापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध आणण्यात आले आहेत. फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इम्युनुएल मॅक्रॉन यांनी एक महिन्याच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. दरम्यान, स्पेन आणि इटलीमध्ये प्रतिबंध हटविण्याच्या मागणीसाठी लोक रस्त्यांवर उतरले आहेत. 
 

Web Title: coronavirus: Decreased morbidity in the country; Mortality rate is only 1.49 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.