coronavirus: प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस मोफत देणार, या राज्यातील सरकारने घेतला मोठा निर्णय
By बाळकृष्ण परब | Updated: October 22, 2020 18:44 IST2020-10-22T18:39:41+5:302020-10-22T18:44:21+5:30
Corona Vaccine News : कोरोना विषाणूविरोधात विकसित होत असलेल्या लसीमुळे या संकटामधून मार्ग निघण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.

coronavirus: प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस मोफत देणार, या राज्यातील सरकारने घेतला मोठा निर्णय
चेन्नई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मात्र कोरोना विषाणूविरोधात विकसित होत असलेल्या लसीमुळे या संकटामधून मार्ग निघण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. दरम्यान, कोरोनावरील लस येण्याचे संकेत मिळताच विविध राज्यांमधील सरकारांकडून लसीकरणाबाबतच्या घोषणा होऊ लागल्या आहेत.
भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या तामिळनाडूमध्ये लसीकरणाबाबत राज्य सरकारने आज मोठी घोषणा केली आहे. तामिळनाडूमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीसामी यांनी केली आहे.
Once #COVID19 vaccine is ready, it will be provided to all people of the state free of cost, announces Tamil Nadu Chief Minister Edappadi K. Palaniswami (File photo) pic.twitter.com/INOtW2Z44u
— ANI (@ANI) October 22, 2020
आज पुद्दुकोट्टई येथे झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री पलानीसामी उपस्थित होते. तेव्हा त्यांनी लसीकरणाबाबत घोषणा केली. यावेळी कोरोनाकाळात सरकारने उचललेल्या पावलांबाबत पलानीसामी यांनी माहिती दिली. तसेच कोरोनावरील लस विकसित झाल्यानंतर राज्यातील सर्व नागरिकांना ती मोफत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
आज भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राज्यात सत्ता आल्यास कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही वेळातच पलानीसामी यांनी ही घोषणा केली आहे. या जाहीरनाम्यात भाजपाने ११ मोठे संकल्प केले आणि सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. ह्लभाजपा है तो भरोसा हैह्ण ५ सूत्रे, एक लक्ष्य, ११ संकल्प' यासह भाजपाने नवीन नाराही दिला आहे. पाटण्यात जाहीरनामा जाहीर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजप नेते भूपेंद्र यादव आणि इतर नेत्यांनी पत्रकार परिषदेत भाषण केले. निर्मला सीतारामन यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मास्क हाच उपाय आहे. परंतु ही लस येताच ती मोठ्या प्रमाणात भारतात तयार होईल. ही लस बिहारच्या लोकांना मोफत दिली जाईल असं आश्वासन भाजपानं दिलं आहे.