coronavirus: Coronavirus infects 8 members of Karnataka Deputy CM's family, son on ventilator | coronavirus: कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांसह कुटुंबातील ८ जणांना कोरोनाचा संसर्ग, मुलगा व्हेंटिलेटरवर

coronavirus: कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांसह कुटुंबातील ८ जणांना कोरोनाचा संसर्ग, मुलगा व्हेंटिलेटरवर

बंगळुरू -गेल्या सात-आठ महिन्यांपासून देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. सर्वसामान्यांपासून ते अनेक मोठमोठी नेतेमंडळीही कोरोनाच्या प्रकोपापासून वाचू शकलेले नाही. दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद करजोल आणि त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच त्यांचे पुत्र डॉ. गोपाल करजोल यांनांही कोरोनाचा संसर्ग झाला असून, ते गेल्या २३ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहेत. करजोल यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.

करजोल यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, माझे पुत्र गोपाल करजोल हे गेल्या २३ दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे व्हेंटिलेटरवर आहेत. मी कोरोना विषाणूच्या संसर्गातून सावरल्यानंतर हल्लीच माझी पत्नी रुग्णालयातून घरी आली आहे. मी स्वत: १९ दिवसांपर्यंत रुग्णालयात राहिल्यानंतर कोरोनामुक्त झालो आहे. आतापर्यंत माझ्या कुटुंबातील एकूण ८ सदस्य कोरोनाबाधित झाले आहेत.

करजोल हे बागलकोट आणि कलबुर्गी जिल्ह्यांचे प्रभारी मंत्री आहेत. तसेच ते बागलकोट जिल्ह्यातील मुढोल मतदारसंघाचे आमदार आहेत. या दोन्ही जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, बागलकोट आणि कलबुर्गी जिल्ह्यांत झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी प्रवास करण्यास आपण अक्षम असल्याचे करजोल यांनी सांगितले.

लांब पल्ल्याचा आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारा प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी मला दिला आहे. त्यामुळे पुरग्रस्त भागाचा दौरा मी टाळत आहे. मात्र असे असले तरी मी जिल्हा प्रशासनच्या सातत्याने संपर्कात आहे. तसेच तेथील परिस्थितीवर नजर ठेवून आहे. २१ ते २६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान करजोल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.

कर्नाटकमध्ये जून महिन्यापासून कोरोनाचा फैलाव वेगाने वाढला होता. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, येडियुरप्पांसह राज्याचे एक उपमुख्यमंत्री डॉ. सी. एस अश्वत्थ नारायण, वनमंत्री आनंद सिंह, सामाजिक कल्याणमंत्री बी. श्रीरामुल, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, प्राथमिक आमि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार. कृषिमंत्री बी. सी. पाटील, माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एस. शिवकुमार यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: Coronavirus infects 8 members of Karnataka Deputy CM's family, son on ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.