Coronavirus: Central government has decided to provide free three LPG cylinders to 8 crore Ujjwala beneficiaries in the corona crisis mac | Coronavirus: केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; ८ कोटी भारतीयांना होणार फायदा

Coronavirus: केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; ८ कोटी भारतीयांना होणार फायदा

नवी दिल्ली: भारतात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे.  कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषणा केली. लॉकडाऊनच्या काळात एलपीजीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांची वाढती मागणी पाहता केंद्र सरकारने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी युएईचे राज्यमंत्री आणि अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (अ‍ॅडनोक) ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अल जाबेर यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या बैठकीविषयी धर्मेंद्र प्रधान यांना विचारल्यास कोरोना संकटामुळे उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ऊर्जा क्षेत्रातील सहकार्यासाठी धोरणात्मक स्वरूपाच्या आधारे कार्य करण्याचे मान्य करण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

भारताच्या विनंतीवरून जुबेरने एडीएनओसीमधून अतिरिक्त एलपीजी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कोरोनाच्या संकटात 8 कोटी उज्ज्वला लाभार्थ्यांना मोफत तीन एलपीजी सिलिंडर्स पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 8 कोटी लोकांना उज्ज्वलाअंतर्गत तीन सिलिंडर पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून मोफत दिले जाणार आहे.

केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील सर्व ग्राहकांना येत्या तीन महिन्यांत मोफत रिफिलची घोषणा केली आहे. 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 पर्यंत ही मदत करेल. यात 8 कोटी लाभार्थ्यांना 14.2 किलो एलपीजी सिलिंडर मोफत मिळणार आहे. तसेच एप्रिल 2020 च्या रिफिल किंमतीची किरकोळ किंमत उज्ज्वला लाभार्थ्यांच्या लिंक बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. त्यामुळे ग्राहकांना विनामूल्य स्वयंपाकाचा गॅस खरेदी करण्यासाठी खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम वापरता येणार आहे.

Web Title: Coronavirus: Central government has decided to provide free three LPG cylinders to 8 crore Ujjwala beneficiaries in the corona crisis mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.