CoronaVirus News: एका दिवसात तब्बल १२ हजार ८८१ नवे रूग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 07:05 IST2020-06-19T03:43:29+5:302020-06-19T07:05:24+5:30
एकूण संख्या ३ लाख ६७ हजारांकडे; १२ हजारांहून अधिक मृत्यू

CoronaVirus News: एका दिवसात तब्बल १२ हजार ८८१ नवे रूग्ण
नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १२ हजार ८८१ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ९४६ झाली आहे. तसेच, २४ तासांत ३३४ जण मरण पावल्यामुळे मरणाऱ्यांची संख्या १२ हजार २३७ झाली आहे.
देशात आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण गेल्या २४ तासांत आढळले आहेत. देशात १ जून ते १८ जून या काळात तब्बल १ लाख ७६ हजार ४११ नवे रुग्ण आढळले असून, ही संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मृत्यूचे प्रमाणही २.८ वरून ३.३ वर गेले असून, ही चिंतेची बाब आहे. मात्र, बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत असून, आतापर्यंत १ लाख ९४ हजार ३२४ रुग्ण (प्रमाण ५२.९५) बरे होऊ न घरी परतले आहेत आणि सध्या १ लाख ६0 हजार ३८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे गुरुवारी देण्यात आली.
जगाच्या तुलनेत भारतातील मृत्यूंचे प्रमाण अतिशय कमी असून, मृत्यूदरात भारत जगामध्ये आठव्या स्थानी आहे. कोरोनाच्या एकूण बळींपैकी ७0 टक्के रुग्णांना अन्य काही ना काही आजार होते, असे आढळून आले आहे. त्यामुळे अन्य काही आजार असणाºयांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे, असे आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकवार स्पष्ट केले आहे.
देशातील एकूण रुग्णांपैकी १ लाख १६ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील असून, त्याखालोखाल तमिळनाडू (५0 हजार) दिल्ली (४७ हजार), गुजरात (२५ हजार) आणि उत्तर प्रदेश (१४ हजार ५00) या राज्यांचा क्रमांक लागतो. देशाच्या प्रत्येक राज्यात कोरोनाचे रुग्ण आहे.
इथे संसर्ग कमी
काही राज्यांत त्यांची संख्या १00 हून कमी आहे. अरुणाचल प्रदेश, मेघालय, सिक्किम, दादरा-नगरहवेली आणि दीव-दमण यांचा त्यात समावेश आहे. ज्या राज्यात पहिला रुग्ण आढळला होता, त्या केरळने कोरोना संसर्ग वाढणार नाही, यासाठी प्रयत्न केल्याने तेथील एकूण रुग्णसंख्या २,७00 च्या आसपास आहे.