Corona Virus : भारतात डेल्टा प्रमाणेच हाहाकार माजवणार कोरोनाचा नवा XE व्हेरिअंट? जाणून घ्या WHO नं काय सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2022 20:40 IST2022-04-06T20:40:15+5:302022-04-06T20:40:56+5:30
"यूकेमधील 600 नमुन्यांमध्ये XE ची ओळखले पटली आहे. तसेच या व्हेरिअंटवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे."

Corona Virus : भारतात डेल्टा प्रमाणेच हाहाकार माजवणार कोरोनाचा नवा XE व्हेरिअंट? जाणून घ्या WHO नं काय सांगितलं
कोरोनाच्या XE व्हेरिअंटने चीनमध्ये पुन्हा एकदा हाहाकार माजवला आहे. कोरोनामुळे शांघाय शहराची परिस्थिती बिकट बनली आहे. येथे पुन्हा एकदा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. आता हा नवा XE व्हेरिअंट भारतातही दाखल झाला आहे. मात्र, या व्हेरिअंटचा परिणाम डेल्टासारखा होणार नाही, कारण देशात मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण झालेले आहे, असे डब्ल्यूएचओचे मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी मंगळवारी म्हटले आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटनेच देशात हाहाकार माजला होता. या व्हेरिअंटमुळेच देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती.
वैज्ञानिकांच्या मते, XE व्हेरिअंट हा इतर व्हेरिअंटच्या तुलनेत 10 पट वेगाने पसरू शकतो. मात्र, प्राथमिक माहितीनुसार, या व्हेरिअंटला घाबरून जाण्याची गरज नाही. तथापि, या प्रकाराबद्दल अद्याप संपूर्ण माहिती आलेली नाही आणि यावर अध्ययन सुरू आहे, असे डब्ल्यूएचओचे म्हणणे आहे.
डब्ल्यूएचओने म्हटले आहे, की या प्रकारात आतापर्यंत अधिक गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. असे लसीकरणामुळे वाढलेल्या रोग प्रतिकारशक्तीमुळे असू शकते. यूकेमधील 600 नमुन्यांमध्ये XE ची ओळखले पटली आहे. तसेच या व्हेरिअंटवर लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
XE ची लक्षणं?
कोरोनाच्या या नव्या व्हेटिअंटच्या लक्षणांत, ताप, घसादुखी, घशात खवखवणे, सर्दी, खोकला यांचा समावेश होतो. याशिवाय त्वचेची आग होणे आणि पोट खराब होणे ही देखील याची लक्षणे आहेत.