Corona Virus In India: देशात कोरोनाचं संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज पत्रकार परिषदेत घेऊन महाराष्ट्र आणि पंजाबमधील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. महत्वाची बाब म्हणजे देशात कोरोनामुळे सर्वात जास्त प्रभावित झालेल्या टॉप १० शहरांमध्ये एकट्या महाराष्ट्रातील ९ शहरांचा समावेश आहे. तर एक शहर कर्नाटकमधील आहे.
"महाराष्ट्रा आणि पंजाबमधील कोरोनाची सद्यस्थिती अतिशय चिंताजनक असून महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २८ हजाराहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर पंजाबमधील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली आहे", असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?केंद्र सरकारनं चिंता व्यक्त केल्यानंतर आता राज्य सरकार देखील अॅक्शन मोडमध्ये येऊन पुन्हा एकदा कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसे संकेतच याआधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत राहिली तर लॉकडाऊन बाबत विचार केला जाईल. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं आरोग्यमंत्र्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
कोरोना रुग्णांमध्ये देशातील टॉप १० शहरं कोणती?
- पुणे
- नागपूर
- मुंबई
- ठाणे
- नाशिक
- औरंगाबाद
- बंगळुरू शहर
- नांदेड
- जळगाव
- अकोला
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्णभारतात कोरोना व्हायरसच्या डबल म्यूटेंट व्हेरिएंटचे रुग्ण देखील वाढताना दिसत आहेत. भारत सरकारनं दिलेल्या माहितीनुसार देशात ७७१ रुग्ण हे कोरोनाच्या नव्या प्रकाराशी संबंधित आहेत. यातील ७२६ रुग्ण हे ब्रिटनमधील नव्या स्ट्रेनचे, ३४ रुग्ण दक्षिण आफ्रिका तर एक रुग्ण ब्राझीलमधील कोरोनाच्या नव्या प्रकाराशी संबंधित आहेत.