Corona Virus : कोरोना काळातील कामाची माहिती द्या, लोकसभा अध्यक्षांचे खासदारांना आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 05:28 IST2021-06-09T05:27:37+5:302021-06-09T05:28:17+5:30
Corona Virus : सर्व खासदारांना लिहिलेल्या पत्रात बिर्ला यांनी म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी म्हणून या गंभीर संकटाच्या प्रसंगी लोकांच्या मदतीसाठी पुढे येणे, हे खासदारांचे कामच आहे.

Corona Virus : कोरोना काळातील कामाची माहिती द्या, लोकसभा अध्यक्षांचे खासदारांना आवाहन
नवी दिल्ली : खासदारांनी त्यांच्या मतदारसंघांमध्ये कोरोना काळात केलेल्या मदतीच्या कामाची माहिती द्यावी, असे आवाहन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले आहे. या तपशीलातून भविष्यात अशा स्थितीशी निपटण्यासाठी योग्य पद्धत विकसित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सर्व खासदारांना लिहिलेल्या पत्रात बिर्ला यांनी म्हटले आहे की, लोकप्रतिनिधी म्हणून या गंभीर संकटाच्या प्रसंगी लोकांच्या मदतीसाठी पुढे येणे, हे खासदारांचे कामच आहे. या महामारीच्या संकटाच्या काळात खासदारांनी त्यांचा जास्तीत जास्त वेळ लोकांची मदत करण्यात घालवला असेल. त्यांनी समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांना केवळ नैतिक पाठबळच दिले नसेल तर त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी भरपूर मदतही केली असेल, असे त्यांनी म्हटले आहे.
आता आपण आपले शानदार कार्य व अनुभव देशासमोर आणण्याची वेळ आलेली आहे, असेही बिर्ला यांनी म्हटले आहे. आपल्या मतदारसंघात जे विद्यार्थी वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेची तयारी करीत असतील व कोरोनामुळे ज्यांचे आई-वडील किंवा कुटुंबातील कमावती व्यक्ती मरण पावली असल्यास त्या विद्यार्थ्याला कोचिंग व निवासाची मोफत व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणाही राजस्थानच्या कोटाचे खासदार असलेले बिर्ला यांनी केली आहे.