Corona virus : कामगारांचा पगार कापू नका, व्यापारी अन् उच्च वर्गीयांना मोदींचं भावनिक आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 21:15 IST2020-03-19T20:41:30+5:302020-03-19T21:15:23+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सर्वसामान्य नागरिकांपासून ते वैद्यकीय क्षेत्रात आणि कोरोनाशी दोनहात करणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या कामगिरीला स्पर्श केला

Corona virus : कामगारांचा पगार कापू नका, व्यापारी अन् उच्च वर्गीयांना मोदींचं भावनिक आवाहन
मुंबई - जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केले. या महासंकटाचा सामना करण्यासाठी देश सज्ज असून कोरोनाला टक्कर देणाऱ्या प्रत्येक भारतीयांचे मोदींनी आभार मानले. तसेच, या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचेही सूचवले आहे. रविवार 22 मार्च रोजी सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत देशात जनता कर्फ्यु लागू करुन नागरिकांनी जगाला एकजुटीचा संदेश द्यावा, असे आवाहनही मोदींनी केले.
पंतप्रधाननरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सर्वसामान्य नागरिकांपासून ते वैद्यकीय क्षेत्रात आणि कोरोनाशी दोनहात करणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या कामगिरीला स्पर्श केला. देशाप्रती सर्वांची कृतज्ञता पाहून कौतुक करत, आभारही मानले. तर, देशावरील हे संकट सर्वांनी एकत्र येऊन हाताळायचे असल्याचं मोदींनी म्हटलं. यावेळी, गरिब आणि मजदूर वर्गांच्या आर्थिक हितासाठी आवाहनही केलंय.
देशातील व्यवसायिक, व्यापारी, लहान-मोठे दुकानदार आणि लहानसहान संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या पगारी कापू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. माणूसकीच्या नात्यातून या गंभीर परिस्थिताचा सामना आपल्याला करायचा आहे. त्यामुळे, कोरोनाच्या लढाईत देशासाठी आपलं योगदान द्यावे, असेही मोदींनी म्हटले.
संकट के इस समय में मेरा देश के व्यापारी जगत,
— PMO India (@PMOIndia) March 19, 2020
उच्च आय वर्ग से भी आग्रह है कि अगर संभव है तो आप
जिन-जिन लोगों से सेवाएं लेते हैं, उनके आर्थिक हितों का ध्यान रखें: PM @narendramodi#IndiaFightsCorona
देशातील उच्चवर्गीय नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोदींनी आवाहन केलं आहे. आपण, सर्वसामान्य नागरिकांकडून ज्या ज्या सेवा घेता, त्यांना या संकटसमयी सुट्टी द्यावी. विशेष म्हणजे या नागरिक, कामगार आणि गरिब सेवाकरी व्यक्तींच्या आर्थिक हिताचाही विचार करावा. या काळात आपण सेवा खंडित केली म्हणून या कामगारांच्या पगारीत कपात करू नका, असा माझा आग्रह असल्याचे मोदींनी म्हटले. ज्याप्रमाणे तुम्हाला मला घरं चालवायचं आहे, तसेच या सेवा देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही आपलं घर चालवायचं असतं. त्यामुळे व्यापारी, उच्च वर्गीय व्यक्ती आणि लहान-मोठ्या संस्थांनी कंपनीत सेवा देणाऱ्यांचे वेतन न कापण्याचं आवाहन मोदींनी केलं आहे.