Corona Virus : बापरे! ताजमहाल पाहायला अर्जेंटीनाहून आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला अन् अचानक गायब झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 14:17 IST2022-12-29T14:10:06+5:302022-12-29T14:17:09+5:30
Corona Virus : परदेशी पर्यटकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत.

Corona Virus : बापरे! ताजमहाल पाहायला अर्जेंटीनाहून आला, कोरोना पॉझिटिव्ह निघाला अन् अचानक गायब झाला
अर्जेंटिनाहून आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी आलेला एक परदेशी पर्यटक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. परदेशी पर्यटकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी त्याचा शोध घेत आहेत. कोविड-19 च्या तपासादरम्यान अर्जेंटिनातील पर्यटकाने दिलेला फोन नंबर आता बंद करण्यात आला आहे. तो कोणत्या हॉटेलमध्ये राहिला आणि तो कोणाच्या संपर्कात आला याचा शोध घेण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग करत आहे. त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जात आहे. परदेशी पर्यटक ज्या हॉटेलमध्ये थांबला होता त्या हॉटेलच्या व्यवस्थापकाकडून तपशील मागविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या पर्यटकाचं सँपल 26 डिसेंबर रोजी घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. बुधवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर आग्राचे सीएमओ अरुण श्रीवास्तव यांनी सर्व हॉटेल चालकांना येथे राहणाऱ्या सर्व पर्यटकांची ट्रॅव्हलिंग हिस्ट्री आणि माहिती शेअर करण्याचे निर्देश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी चीनमधून परतलेला एका व्यावसायिक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आरोग्य विभागाने ताजमहालसह सार्वजनिक ठिकाणी कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
विदेशी पर्यटकांची RT-PCR चाचणी ताजमहालच्या सर्व गेटवर विचारण्यात आली, पण तपास सोडा, ताजमहालच्या सर्व गेटवर कोविड-19 नियमांची पायमल्ली केली जात आहे. लोक मास्क घालत आहेत, पण गर्दी इतकी आहे की सोशल डिस्टंसिंग पाळले जात नाही. ताजमहालच्या सर्व गेटवर विशेषत: परदेशी पर्यटकांसाठी आरटी-पीसीआर चाचणी करावी, असे स्पष्ट निर्देश सीएमओने दिले आहेत.
आरोग्य विभागाकडून या नियमांकडे कमालीचे दुर्लक्ष केले जात आहे. आरटी-पीसीआर चाचणी करणारे कर्मचारी वेळेवर येत नाहीत. अर्जेंटिनाच्या पर्यटकाला ज्या प्रकारे कोरोनाची लागण झाली आहे, त्यामुळे आणखी पर्यटकांनाही याची लागण होऊ शकते. दररोज 25 ते 30 हजार पर्यटक ताजमहाल पाहण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत जर काटेकोरपणा आणि खबरदारी घेतली नाही तर इथून कोरोना संसर्गाचा वेग वाढू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"