Corona Vaccine: ‘स्पुटनिक व्ही’ १ मेपर्यंत भारतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2021 06:20 IST2021-04-28T06:15:32+5:302021-04-28T06:20:11+5:30
या लसीच्या किती मात्रा प्राप्त होणार आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.

Corona Vaccine: ‘स्पुटनिक व्ही’ १ मेपर्यंत भारतात
नवी दिल्ली : भारतात कोरोनाप्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा १ मेपासून सुरू होत असताना रशियन बनावटीची ‘स्पुटनिक व्ही’ ही लसही त्याच दिवशी भारतात दाखल होत असल्याचे वृत्त आहे. परंतु या लसीच्या किती मात्रा प्राप्त होणार आहेत, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही.
‘स्पुटनिक व्ही’ लसीचे निर्माते असलेल्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ) या संस्थेचे प्रमुख किरिल दिमित्रिएव्ह यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी लसीच्या मात्रा भारतात उपलब्ध होणार आहेत. या लसीमुळे भारताला कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात काही प्रमाणात यश मिळेल, अशी पुस्तीही दिमित्रिएव्ह यांनी जोडली. परंतु लसीच्या किती मात्रा भारताला पुरवल्या जातील, याबाबत अधिक काही सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली.
ॲस्ट्राझेनेकाची लसही मिळणार
अमेरिकी प्रशासनानेही भारताला मदतीची तयारी दर्शवली असून नजीकच्या काळात ॲस्ट्राझेनेका लसीचे डोस जगाला पुरवण्यासाठी अमेरिका सज्ज असेल. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने अद्याप ॲस्ट्राझेनेका लसीच्या वापराला मंजुरी दिलेली नाही. ही मंजुरी मिळताच ॲस्ट्राझेनेका लसीचे सहा कोटी डोस जगभरात निर्यात करणार आहे. त्यात भारताचाही समावेश असेल.