Corona vaccine possible at the beginning of the year; Study on how to distribute the vaccine | Coronavirus: कोरोना लस वर्षाच्या प्रारंभी शक्य;  लसीचे वितरण कसे करायचे यावर अभ्यास सुरू

Coronavirus: कोरोना लस वर्षाच्या प्रारंभी शक्य;  लसीचे वितरण कसे करायचे यावर अभ्यास सुरू

नवी दिल्ली : कोरोना विषाणूवरील (कोविड-१९) लस भारताकडे पुढील वर्षीच्या प्रारंभी असण्याची शक्यता असून ती अनेक मार्गांनी येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंगळवारी मंत्रीगटाच्या बैठकीत म्हटले.

‘‘पुढील वर्षीच्या प्रारंभी आमच्याकडे एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून लस आलेली असेल अशी अपेक्षा आहे. देशात या लशीचे वितरण कसे करायचे याची योजना आमचे तज्ज्ञांचे गट तयार करत आहेत,’’ असेही ते म्हणाले. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनीही म्हटले की, ‘‘२०२० च्या अखेरीस किंवा नूतन वर्षाच्या प्रारंभी लस नोंदणीसाठी तयार असेल.’’

‘जॉन्सन अँड जॉन्सन’ने अभ्यास थांबवला
कोविड-१९ लशीचा उलट परिणाम रुग्णावर झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने सोमवारी या लशीच्या पुढील पायरीचा अभ्यास थांबवला आहे. या रुग्णाचा ‘ न सांगता येणारा आजार’ सध्या कंपनी तपासत असून त्यानंतर कंपनीने सोमवारी निवेदन प्रसिद्धीस दिले.‘‘कोणत्याही क्लिनिकल (प्रयोग शाळेतील पद्धतीवर आधारित) अभ्यासात विशेषत: व्यापक अभ्यासात अपघात आणि इतर तथाकथित उलट घटना अपेक्षित असतात’ असे कंपनीने त्यात म्हटले. त्या रुग्णाला आलेल्या आजारपणामागील नेमके कारण कोणते हे डॉक्टर्स आणि सुरक्षेवर लक्ष ठेवणारी समिती निश्चित करेल, असेही कंपनीने म्हटले.

कोवाक्सिन, कॅडिलाची चाचणी नोव्हेंबरपर्यंत
कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, स्वदेश निर्मित कोवाक्सिन आणि जाइडस कॅडिला वॅक्सिनची चाचणी सुरु आहे. याचे परिणाम नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात समोर येतील. दोन्ही लसींचा पहिला टप्पा यशस्वी ठरला आहे आॅक्सफर्डच्या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. याचे परिणाम नोव्हेंबर अखेर वा डिसेंबर मध्यापर्यंत समोर येतील.
आॅक्सफोर्ड लसीची चाचणी सीरम इन्स्टिट्यूटकडून करण्यात येत आहे. ही चाचणीही योग्य दिशेने सुरु आहे. आतापर्यंत त्याचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत.

थंडीसोबत येऊ शकते नवी लाट
थंडी वाढल्यावर बाहेरच्या देशात कोरोनाचा प्रकोप पुन्हा वाढेल अशी चिंता नीती आयोगाचे सदस्य आणि कोरोना टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली आहे. युरोपातील काही देश आणि अमेरिकेत कोरोनाची नवी लाट पहायला मिळत आहे. देशात आता नवरात्र, ईद, दिवाळी, नाताळ आणि नवे वर्ष असे अनेक सण उत्सव आहेत. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, विशिष्ट अंतर राखणे आणि हात साबणाने वारंवार स्वच्छ करणे हे उपाय करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Corona vaccine possible at the beginning of the year; Study on how to distribute the vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.