Corona Vaccination: कोविशील्डचा एक डोस घेतलेल्यांना लवकरच दिलासा? मोठा निर्णय होण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 08:02 IST2021-10-25T08:01:49+5:302021-10-25T08:02:07+5:30
Corona Vaccination: देशातील लसीकरण अभियानाला आणखी वेग देण्याची गरज; दुसरा डोस लवकर देण्याची आवश्यकता

Corona Vaccination: कोविशील्डचा एक डोस घेतलेल्यांना लवकरच दिलासा? मोठा निर्णय होण्याची शक्यता
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी हळूहळू ओसरू लागली आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर झाली आहे. चीन आणि ब्रिटनमध्ये मात्र कोरोनानं थैमान घातलं आहे. त्यामुळे भारतानं वेगानं लसीकरण वेगानं पूर्ण करण्यावर भर द्यायला हवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर कमी करायला हवं, असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
देशात राबवण्यात येत असलेल्या लसीकरण अभियानात ८० टक्के वाटा एकट्या कोविशील्डचा आहे. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचं आहे. दिल्लीत ८७ टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. तर दोन्ही डोस घेतलेल्यांचं प्रमाण ४७ टक्के आहे. जोपर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचं प्रमाण वाढणार नाही, तोपर्यंत कोरोना संक्रमण आणि नव्या व्हेरिएंटचा धोका कायम राहील. हा धोका कमी करायचा असल्यास दुसरा डोस लवकर पूर्ण करायला हवा. त्यासाठी दोन डोसमधील अंतर ४ ते ६ आठवड्यांवर आणायला हवं, असं तज्ज्ञांना वाटतं.
चीन, ब्रिटनमध्ये कोरोनाचा स्फोट
चीन आणि ब्रिटनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला आहे. नव्या व्हेरिएंटमुळे आणि कोरोना लसीमुळे तयार झालेल्या अँटिबॉडी घटल्यानं कोरोनाचा संसर्ग वाढल्याचं कोविड तज्ज्ञ डॉक्टर अंशुमान कुमार यांनी सांगितलं. भारतात आतापर्यंत केवळ ३० कोटी लोकांनाच कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. तर ७० कोटी एकच डोस मिळाला आहे.
संपूर्ण देशात कोविशील्डचा ८० टक्के वापर
संपूर्ण देशात लसीकरण अभियानात कोविशील्ड लसीचा वापर सर्वाधिक झाला आहे. लसीकरण मोहिमेत कोविशील्डचा वाटा ८० टक्के आहे. कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचं आहे. त्यामुळे एका व्यक्तीचं संपूर्ण लसीकरण होण्यास किमान ८४ दिवसांचा कालावधी लागतो. आता हे अंतर कमी करण्याची वेळ आली आहे, असं मत सफदरजंगमधील कोविड तज्ज्ञ आणि कम्युनिटी मेडिसीनचे एचओडी डॉ. जुगल किशोर यांनी व्यक्त केलं.