Corona Vaccination: 'मेड इन इंडिया' कोवॅक्सिनबद्दल महत्त्वाची बातमी; लवकरच मिळणार मोठा दिलासा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 15:08 IST2021-07-10T15:00:11+5:302021-07-10T15:08:40+5:30
Corona Vaccination: भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनचं जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञांकडून कौतुक

Corona Vaccination: 'मेड इन इंडिया' कोवॅक्सिनबद्दल महत्त्वाची बातमी; लवकरच मिळणार मोठा दिलासा?
नवी दिल्ली: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी सध्या लसीकरण अभियानाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. लसीकरण मोहिमेत कोविशील्ड आणि कोवॅक्सीनचा सर्वाधिक वापर होत आहे. कोविशील्ड लसीला अनेक देशांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे कोविशील्ड लस घेतलेल्यांना अनेक देशांत प्रवास करण्याची मुभा आहे. मात्र कोवॅक्सिन लस घेतलेल्यांना अनेक देशांनी अद्याप ग्रीन सिग्नल दिलेला नाही. परंतु कोवॅक्सिन घेतलेल्यांना लवकरच मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याबद्दल महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
भारत बायोटेकनं तयार केलेली कोवॅक्सिन अतिशय प्रभावी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे. कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी मिळावी यासाठी भारत बायोटेकचे सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत. 'कोवॅक्सिनच्या चाचण्यांचा तपशील योग्य वाटत आहे. २३ जूनला यासंदर्भात एक बैठक झाली होती. कोवॅक्सिननं आतापर्यंत जागतिक आरोग्य संघटनेचे सुरक्षा निकष पूर्ण केले आहेत,' अशी माहिती स्वामीनाथन यांनी दिली.
'कोवॅक्सिनचे तिसऱ्या चाचण्यांचे निष्कर्ष चांगले आहेत. कोवॅक्सिन अतिशय प्रभावी आहे. डेल्टा व्हेरिएंटविरुद्ध लसीचा प्रभाव कमी आहे. मात्र तरीही चांगला आहे,' असं स्वामीनाथन एका मुलाखतीत म्हणाल्या. 'अमेरिका वगळता जगातील बहुतांश भागांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मृत्यूंचं प्रमाणदेखील कमी झालेलं नाही,' अशी माहिती त्यांनी दिली. भारतातील किमान ६० ते ७० टक्के लोकसंख्येचं प्राथमिक लसीकरण व्हायला हवं, असा सल्ला त्यांनी दिला. कोरोनाचं संकट पूर्णपणे संपवण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.