धक्कादायक ! कोरोना चाचणी महिलेची, अहवाल दिला पुरुषाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 07:37 AM2022-01-24T07:37:20+5:302022-01-24T07:37:38+5:30

दादरमधील प्रकार, ईसीजीमध्ये केली खाडाखोड

Corona test for woman, reported for man in mumbai | धक्कादायक ! कोरोना चाचणी महिलेची, अहवाल दिला पुरुषाचा...

धक्कादायक ! कोरोना चाचणी महिलेची, अहवाल दिला पुरुषाचा...

googlenewsNext

मनीषा म्हात्रे 

मुंबई : वृद्ध आईची रात्रीच्या सुमारास प्रकृती बिघडल्याने तिला दादरच्या बड्या रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयाने बोलावलेल्या तरुणाकड़ून कोरोना चाचणी झाली. अहवाल निगेटिव्ह येताच, ईसीजीसह अन्य चाचण्या झाल्या. तेथून अन्य रुग्णालयात हलवले. लाखोंचा खर्चही झाला. मात्र, उपचारानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये, आईच्या नावाने दिलेला कोरोना चाचणी अहवाल बदलापूरमधील पुरुषाचा असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. 
याप्रकरणी दादर पोलिसांनी लॅब टेक्निशियन मोहम्मद तमीजउद्दीन जलालउद्दीन (२४), डॉ. ब्रिजेश गुप्ता, बादशहा, सफा नावाच्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला. 

प्रभादेवी परिसरात राहणाऱ्या विनायक बाले (३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १२ सप्टेबर रोजी ६३ वर्षीय भाग्या यांच्या  मानेत दुखायला लागले. त्यामुळे त्यांना दादरच्या लाईफकेअर हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. तेथील कर्मचाऱ्यांनी बोलावलेल्या बादशाह नावाची व्यक्ती सॅम्पल घेऊन गेली. थायरोकेअर लॅबच्या नावाने पावतीही मिळाली.  अहवाल निगेटिव्ह येताच, पुढे ईसीजी काढण्यात आले. तेथून डॉ. ब्रिजेश गुप्ता यांनी सिम्बोयसिस रुग्णालयात नेण्यास सांगितले. तेथे डॉ. अंकित देढीया यांनी तिची ॲन्जिओग्राफी व त्यानंतर ॲन्जिओप्लास्टी केली. तेथे १८ सप्टेबरपर्यंत उपचार झाले. 

२२ तारखेला आईला जास्त त्रास झाल्याने तिला पुन्हा लाईफकेअर हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. गुप्ता यांनी पुन्हा कोरोना चाचणी करण्यास सांगितले.  २४ तारखेला आईला डिस्जार्ज दिला. यादरम्यान तिच्यावर काय उपचार केले याबाबतची फाईल हाॅस्पिटलकडून मिळताच संशय आला. ईसीजी अहवालात हाॅस्पिटलच्या नोंदीनुसार, १३ सप्टेबर रोजी दाखल केले असताना ईसीजी प्रिंटिंगमध्ये ६ सप्टेंबरची तारीख दिसून आली. त्यात १४ आणि १५  तारखेच्या ईसीजीमध्येही तशीच चूक दिसून आली. त्यामुळे त्यांनी कोरोनाच्या अहवालाबाबत थायरोकेअरकडे चौकशी केली.  आईच्या नावाने दिलेला अहवाल हा सय्यद अलीचा असल्याचे समजले. तसेच रिपोर्टमध्ये कलेक्शनचे ठिकाण बदलापूर असल्याचे होते. वास्तविक स्वॅब कलेक्शन दादर येथील लाईफकेअर या हाॅस्पिटलमधून घेतले होते. त्यामुळे त्यांना धक्का बसला.  

कारवाई करू  नका, पैसे घ्या...
विनायक यांनी पोलिसांकडे धाव घेत सर्व पावती आणि लेखी तक्रार दिली. त्यानंतर संबंधित तरुणाने कॉल करून २६ सष्टेंबर रोजी त्यांच्या खात्यात ५ हजार रुपये पाठवले. त्यांनी ते पैसे पुन्हा पाठवले. त्याचा स्क्रीनशॉटही त्यांनी पोलिसांना दिला आहे.

दीड वर्षांपूर्वीच कामावरून काढले
n कोरोना चाचणीचे अहवाल घेऊन जाणाऱ्या तरुणाला दीड वर्षापूर्वीच कामावरून काढल्याचे थायरोकेअरकडून समजले. 
n मात्र तरुणाने ही बाब लपवली. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्याने त्याला नेहमीप्रमाणे कॉल करून बोलावून घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. 

कोरोना चाचणी अहवाल बनावट असल्याचे समजताच रुग्णालय प्रशासनाकडूनही संबंधित तरुणाविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली आहे. शिवाय योग्य उपचार करून संबंधित रुग्ण, कार्डियक समस्या असल्याने ईसीजी रिपोर्ट करून पुढील रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला. त्यांना उपचार योग्य मिळाला की नाही याबाबत जे. जे रुग्णालयातील आरोग्य समितीने योग्य चौकशी केल्यास सर्व गोष्टी उघडकीस येतील. 
- डॉ. योगेश बाफना, प्रशासकीय प्रमुख, लाईफकेअर रुग्णालय, दादर

याप्रकरणी कोरोना चाचणीचे नमुने घेणाऱ्या तरुणासह चौघांंविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लाईफकेअर हॉस्पिटल कर्मचारी, डॉक्टर तसेच थायरोकेअर लॅबच्या कर्मचाऱ्याचे जबाब नोंदवत तपास सुरू आहे. याप्रकरणी जे. जे. रुग्णालयातील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
- महेश मुगुटराव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दादर पोलीस ठाणे

लाइफकेअरमध्ये आई दाखल असताना डॉ. ब्रिजेश गुप्ता यांनी खोटे ईसीजी बनवून त्यावर खाडाखोड करून थायरोकेअर लॅबच्या नावाने बनावट व्यक्तीकड़ून आईचा कोविड रिपोर्ट तसेच बनावट पावती देऊन लाईफकेअर हाॅस्पिटल तसेच सिम्बाँयसीस हाॅस्पिटलमध्ये उपचार घेण्यास भाग पाडले. तीन महिने पोलीस ठाण्याच्या पायऱ्या झिजवल्यानंतर गुन्हा दाखल केला. यात रुग्णालयाला वाचवण्याचा प्रयत्न होत असून यात मोठे     रॅकेट आहे. 
-  विनायक बाले, 
तक्रारदार, प्रभादेवी

Web Title: Corona test for woman, reported for man in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.