‘काँग्रेस म्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:12 IST2025-11-07T14:12:23+5:302025-11-07T15:12:22+5:30
Revanth Reddy News: तेलंगाणामधील ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय पारा चढला आहे. यादरम्यान, जुबिली हिल्समधील काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या एका विधानामुळे आता मोठा वाद पेटला आहे. ‘

‘काँग्रेस म्हणजेच मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजेच काँग्रेस’, रेवंत रेड्डीच्या विधानावरून वाद
तेलंगाणामधील ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय पारा चढला आहे. यादरम्यान, जुबिली हिल्समधील काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या एका विधानामुळे आता मोठा वाद पेटला आहे. ‘काँग्रेसचा अर्थ आहे मुस्लिम आणि मुस्लिमांचा अर्थ आहे काँग्रेस’, असे विधान रेवंत रेड्डी यांनी केलं आहे. तसेच रेवंत रेड्डी यांच्या या विधानावर आता विरोधी पक्षातील भाजपाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. मात्र रेवंत रेड्डी यांच्या या विधानामागे एक विचारपूर्वक आखलेली रणनीती असल्याचं म्हटलं जात आहे.
जुबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या पोटनिवडणुकीसाठी एकूण ५८ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र येथे मुख्य लढत ही बीआरएसच्या उमेदवार मगंती सुनिता, काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव आणि भाजपाचे उमेदवार लंकाला दीपक रेड्डी यांच्यात आहे. त्यातही ओवेसी यांच्या एमआयएमने काँग्रेस उमेदवार नवीन यादव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतांचं विभाजन झाल्यास त्याचा फायदा भाजपाला होऊ शकतो. त्यामुळे मुस्लिम मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रसंगावधान राखत रेवंत रेड्डी यांनी हे विधान केल्याचं बोललं जात आहे.
या विधानामधून तेलंगाणामध्ये मुस्लिमांना संधी देणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचं रेवंत रेड्डी यांना दाखवून द्यायचं होतं. जुबिली हिल्स विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. येथे सुमारे १.४ लाख मुस्लिम मतदार आहेत. त्यामुळे आपण मुस्लिमांचे सर्वात मोठे हितचिंतक असल्याचे दाखवून देण्यासाठी रेवंत रेड्डी यांनी हे विधान आहे. दरम्यान, रेवंड रेड्डी यांनी केलेल्या या वक्तव्यावर आता विरोधकांकडून जोरगार टीका केली जात आहे. रेवंत रेडींचं विधान हे व्होटबँकेचे राजकारण असल्याचा दावा भाजपाने केला आहे. तर बीआरएनेही या विधानावर टीका केली आहे.