Shivajinagar Metro Station Controversy:कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचे नाव बदलण्याचे आश्वासन दिल्यानंतर कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवाजी नगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी असे ठेवण्याची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला आहे. सोशल मीडियावर या मागणीवरुन वाद सुरू झाला आहे. तसेच शिवप्रेमींनीही याबाबत संताप व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव असलेल्या स्टेशनचे नाव बदलण्याचा प्रकार अवमानकारक असल्याचे शिवप्रेमींनी म्हटलं.
सोमवारी सेंट मेरी बॅसिलिका येथे वार्षिक कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी याबाबत भाष्य केलं. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आर्चबिशप पीटर मचाडो यांना आश्वासन दिले की सरकार या विनंतीचा सकारात्मक विचार करेल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बॅसिलिकाच्या नूतनीकरणासाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला जाईल आणि योग्य प्रक्रियेनुसार कार्यवाही केली जाईल, असं मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.
शिवाजीनगर परिसरातील आमदार रिझवान अर्शद यांनी हा प्रस्ताव मांडला होता. "मी मेट्रो स्टेशनला शिवाजीनगर सेंट मेरीज असे नाव देण्याचा औपचारिक प्रस्ताव मांडत आहे. हे सेंट मेरीज बॅसिलिकाच्या सन्मानार्थ आहे, ज्याचा इतिहास समृद्ध आहे. बॅसिलिका शिवाजीनगर बस डेपोजवळ आहे. त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांचाही गोंधळ होणार नाही. अशी अनेक स्टेशन्स आहेत ज्यांना शंकर नाग यांचे नाव देता येऊ शकतं," असं रिझवान अर्शद यांनी म्हटलं.
दुसरीकडे, मेट्रो स्टेशनला दिवंगत कन्नड अभिनेते-दिग्दर्शक शंकर नाग यांचे नाव का दिले गेले नाही असंही विचारलं जात आहे. शंकर नाग हे एक प्रसिद्ध कन्नड अभिनेते-दिग्दर्शक होते. नाग यांनी १९८० च्या दशकात इतर देशांमधील मेट्रो रेल्वे नेटवर्कचा अभ्यास केला होता. त्यांनी बंगळुरूमध्ये शहरी रेल्वे वाहतूक व्यवस्थेचा जोरदार पुरस्कार केला. शंकर नाग यांना बंगळुरूला सिंगापूरसारखे बनवायचे होते.
दरम्यान, बंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने अद्याप या प्रस्तावावर कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही.