त्रिपुरामध्ये ३ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याने वाद, भारत सरकारनं दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 20:40 IST2025-10-17T20:38:54+5:302025-10-17T20:40:18+5:30
Tripura News: त्रिपुरामध्ये तीन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याने मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच बांगलादेशने याबाबत तीव्र आक्षेप घेतल्यानंतर भारत सरकारनेही तितकंच तिखट प्रत्युत्तर दिलं आहे. या तिन्ही बांगलादेशी नागरिकांनी त्रिपुरामधील एका ग्रामस्थाची हत्या केल्याचा आरोप होता.

त्रिपुरामध्ये ३ बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याने वाद, भारत सरकारनं दिलं असं उत्तर
त्रिपुरामध्ये तीन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाल्याने मोठ्या वादाला तोंड फुटलं आहे. तसेच बांगलादेशने याबाबत तीव्र आक्षेप घेतल्यानंतर भारत सरकारनेही तितकंच तिखट प्रत्युत्तर दिलं आहे. या तिन्ही बांगलादेशी नागरिकांनी त्रिपुरामधील एका ग्रामस्थाची हत्या केल्याचा आरोप होता. तसेच मृत्युमुखी पडलेले तीन बांगलादेशी हे गुरे चोरणार तस्कर असल्याची माहिती भारत सरकारने दिली आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार ही घटना १५ ऑक्टोबर रोजी घडली. यात तीन बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला. या तिन्ही बांगलादेशी नागरिकांनी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गुरे चोरण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी स्थानिकांवर लोखंडी सळ्या आणि चाकूने हल्ला केला, यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी या बांगलादेशी नागरिकांच्या हल्ल्याचा प्रतिकार केला.
दरम्यान, बांगलादेशने मृत बांगलादेशी नागरिकांसाठी न्यायाची मागणी करत निष्पक्ष आणि पारदर्शक तपासाची मागणी केली आहे. बेकायदेशीररीत्या भारताच्या हद्दीत घुसल्यानंतर मृत्यू झालेल्या तीन बांगलादेशी नागरिकांच्या मृत्यूबाबत बांगलादेशकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. तसेच बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही घटना म्हणजे मानवाधिकारांचं उल्लंघन असल्याचाही दावा केला आहे.