चिनी ‘रोबोटिक डॉग’मुळे वाद; गलगोटिया विद्यापीठाने चीनच्या संशोधनाला स्वतःचा शोध म्हणून सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 09:00 IST2026-02-19T08:59:17+5:302026-02-19T09:00:48+5:30
फजितीनंतर एआय समिटमधून हकालपट्टी; एआय क्षेत्रात पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर

चिनी ‘रोबोटिक डॉग’मुळे वाद; गलगोटिया विद्यापीठाने चीनच्या संशोधनाला स्वतःचा शोध म्हणून सांगितले
नवी दिल्ली : देश तंत्रज्ञानात स्वयंपूर्ण होण्याचे स्वप्न पाहत असताना, दुसऱ्याचे उत्पादन स्वतःचे सांगून मिरवणे नामांकित विद्यापीठाला भोवले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या ‘एआय इम्पॅक्ट समिट’मध्ये चीनमध्ये बनवलेल्या ‘रोबोटिक डॉग’ला स्वतःचा शोध म्हणून सांगणाऱ्या गलगोटिया विद्यापीठावर सरकारने कारवाई केली. या वादानंतर विद्यापीठाचा स्टॉल प्रदर्शनातून तातडीने हटवला असून, त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. घडलेल्या प्रकारामुळे एआय क्षेत्रातील नैतिकता व पारदर्शकतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
एआय प्रदर्शनात गलगोटिया विद्यापीठाने ‘ओरियन’ नावाचा एक रोबोटिक कुत्रा सादर केला होता. विद्यापीठाच्या कम्युनिकेशन विभागाच्या प्रोफेसर नेहा सिंह यांनी हा रोबोट गलगोटिया विद्यापीठाच्या ‘सेंटर ऑफ एक्सिलेंस’ने स्वतः विकसित केला असल्याचे म्हटले होते.
पायलटचा वापर करून अजित पवारांचा घातपात; रोहित पवार यांचा दावा, ब्लॅक बॉक्सवरही प्रश्नचिन्ह
नेमके कसे फुटले बिंग?
प्रोफेसर नेहा सिंह यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच तंत्रज्ञानप्रेमींनी त्यांचे बिंग फोडले. रोबोट प्रत्यक्षात चीनच्या ‘युनिट्री रोबोटिक्स’ कंपनीने बनवलेला ‘युनिट्री गो२’ असल्याचे समोर आले. रोबोट जगात कुठेही विकत मिळू शकतो. दुसऱ्याच्या कष्टाला स्वतःचे नाव देऊन प्रदर्शनात मांडल्याने सोशल मीडियात विद्यापीठावर टीकेची झोड उठली.
सरकारची कडक भूमिका
या वादानंतर माहिती तंत्रज्ञान (आयटी) मंत्रालयाने तातडीने दखल घेतली. आयटी सचिव एस. कृष्णन यांनी स्पष्ट केले की, सरकार अशा कोणत्याही संस्थेला थारा देणार नाही जी दुसऱ्याची उत्पादने स्वतःची सांगून लोकांची दिशाभूल करते. आम्हाला कोणतेही वाद नको आहेत, त्यामुळे विद्यापीठाला स्टॉल रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत.
विद्यापीठाची सारवासारव
टीकेनंतर विद्यापीठ व महिला प्राध्यापिकेने बचावात्मक पवित्रा घेतला. आम्ही हा रोबोट स्वतः बनवला असा दावा कधीच केला नाही. हा रोबोट केवळ विद्यार्थ्यांना एआय प्रोग्रामिंग शिकवण्यासाठी वापरला जात होता, असे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले. विद्यापीठाने ही चूक महिला प्राध्यापिकेवर ढकलली आहे.