पँगाँग सरोवराजवळ लष्कराने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद, स्थानिकांनी केला विरोध, केला असा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:41 IST2024-12-30T12:40:01+5:302024-12-30T12:41:17+5:30
Chhatrapati Shivaji Maharaj statue: लडाखमधील पँगाँग सरोवराजवळ भारतीय लष्कराने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं होतं. लष्कराने उचललेल्या या पावलाचं कौतुक होत असतानाचा काही जणांकडूक त्याला विरोधही होऊ लागला आहे.

पँगाँग सरोवराजवळ लष्कराने उभारलेल्या शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद, स्थानिकांनी केला विरोध, केला असा दावा
भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर असलेल्या आणि आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पँगाँग सरोवराजवळ भारतीय लष्कराने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं नुकतंच अनावरण करण्यात आलं होतं. लष्कराने उचललेल्या या पावलाचं कौतुक होत असतानाचा काही जणांकडूक त्याला विरोधही होऊ लागला आहे. अत्यंत संवेदनशील असलेल्या या भागात उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा येथे भारताच्या सामरिक आणि सांस्कृतिक उपस्थितीचं प्रतीक ठरत आहे. मात्र त्याचवेळी या पुतळ्याची उभारणी करताना लडाखचा वारसा आणि तेथील इकोसिस्टिमकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
चुशुलचे कौन्सिलर कोनचो स्टानजिन यांनी सांगितले की, हा पुतळा उभारताना स्थानिक रहिवाशांसोबत कुठलीही सल्लामसलत करण्यात आली नाही. आमच्याकडी विशिष्ट्य पर्यावरण आणि प्राणीजीवन पाहता स्थानिकांचा कुठलाही सल्ला न घेता हा पुतळा उभारण्यात आला. त्यामुळे या पुतळ्याच्या औचित्याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. येथे आपण अशा प्रकल्पांना प्राधान्य दिलं पाहिजे जे आमचा समुदाय आणि निसर्गाप्रति सन्मान प्रकट करून तो प्रतिबिंबीत करतील.
स्टानजिन यांनी केलेल्या दाव्यामुळे राष्ट्रीय प्रतीकं, स्थानिक ओळख आणि परिसंस्था यांच्याबाबतच्या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फोडलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे त्याचे समर्थक राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचं प्रतीक म्हणून पाहत आहेत. तर विरोधकांच्या मते यामध्ये लडाखचं वैशिष्टपूर्ण सांस्कृतिक रूप आणि परिसंस्थेची छाप दिसेल असा सर्वसमावेशक दृष्टिकोन अवलंबला गेला पाहिजे होता.
As a local resident, I must voice my concerns about the Shivaji statue at Pangong. It was erected without local input, and I question its relevance to our unique environment and wildlife. Let's prioritize projects that truly reflect and respect our community and nature. https://t.co/7mpu3yceDp
— Konchok Stanzin (@kstanzinladakh) December 29, 2024
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याबाबत लष्कराने दिलेल्या निवेदनानुसार, शिवरायांची ही प्रतिमा वीरता, दूरदर्शिता आणि अतूट न्यायाचं विशाल प्रतीक आहे. लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने साांगितले की, २६ डिसेंबर २०२४ रोजी पँगाँग सरोवराच्या किनाऱ्यावर १४ हजार ३०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं आहे.