पैगंबर प्रकरणी वाद चिघळला, अल कायदाची भारताला धमकी; दिल्ली, मुंबई, यूपीत हल्ला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 23:08 IST2022-06-07T23:08:18+5:302022-06-07T23:08:42+5:30
पैगंबर मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू असं अल कायदा संघटनेने म्हटलं आहे.

पैगंबर प्रकरणी वाद चिघळला, अल कायदाची भारताला धमकी; दिल्ली, मुंबई, यूपीत हल्ला?
नवी दिल्ली - अल कायदा या दहशतवादी संघटनेने भारतात आत्मघाती हल्ले करण्याची धमकी दिली आहे. गुजरात, यूपी, मुंबई आणि दिल्ली येथे आत्मघाती हल्ले करण्यास तयार असल्याची अधिकृत धमकी त्याने दिली. त्याचबरोबर भाजपा लवकरच संपुष्टात येईल असेही ते म्हणाले. भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांनी टीव्ही डिबेट चर्चेदरम्यान दिलेल्या वक्तव्याबाबत अल कायदाने ही धमकी दिली आहे. या वादाचाही त्यांनी आपल्या संदेशात उल्लेख केला आहे.
अल-कायदाने सांगितले की, काही दिवसांपूर्वी हिंदुत्वाच्या प्रचारकाने टीव्हीच्या चर्चेदरम्यान इस्लाम आणि पैंगंबर मोहम्मद यांचा अपमान केला होता. त्यांच्या वक्तव्यामुळे जगभरातील मुस्लिमांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ. आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. पैगंबर मोहम्मद यांचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू. आम्ही आमच्या शरीराला आणि आमच्या मुलांच्या शरीराला स्फोटके बांधू जेणेकरून अशा लोकांना उडवता येईल असं त्यांनी म्हटलं.
तसेच पैगंबर मुहम्मद यांच्यावर गुन्हेगारांना आम्ही माफ करणार नाही. दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमधील भगव्या कार्यकर्त्यांना संपवणार. ते ना त्यांच्या घरात लपू शकतील किंवा सुरक्षा दलही त्यांना वाचवू शकणार नाही. पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा जोर धरत आहे. या प्रकरणात नुपूर शर्माला धमक्या मिळाल्याचा आरोप करण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्माला सुरक्षा पुरवली आहे. तिला आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची तक्रार नुपूर शर्माने दिल्ली पोलिसांकडे केली होती. यानंतर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. आता दिल्ली पोलिसांनी नुपूर शर्मा आणि तिच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
१२ मुस्लिम देशांनी आक्षेप घेतला
आखाती देशातील अनेक इस्लामिक देशांनी भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे. भाजपा प्रवक्त्यांच्या विधानावर आतापर्यंत १२ देशांनी आक्षेप घेतला आहे. ज्यामध्ये कतार, UAE, इराण, कुवैती, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, इंडोनेशिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मालदीव यांचा समावेश आहे. भाजपाकडून दोन्ही नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. नुपूर शर्माला पक्षाने निलंबित केले आहे.