इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 15:27 IST2025-12-31T15:25:28+5:302025-12-31T15:27:19+5:30
Indore News: देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या इंदूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दूषित पाण्यामुळे १००० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास होत आहे.

इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
देशातील सर्वात स्वच्छ शहरांपैकी एक असलेल्या इंदूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर या दूषित पाण्यामुळे १००० हून अधिक लोकांना पोटदुखी आणि उलट्या-जुलाबांचा त्रास होत आहे. इंदूर शहरामध्ये नर्मदा नदीमधून येणारं पाणी हे आजार आणि मृत्यूचं कारण ठरत असल्याचं समोर आलं आहे. आता खबरदारीचा उपाय म्हणून महानगरपालिकेने प्रभावित भागातील पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच जलवाहिनीची दुरुस्ती केली जात असून, टँकरमधून स्वच्छ पाणी पुरवलं जात आहे. तसेच आरोग्य विभागाची पथके घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी करत आहे.
दूषित पाणीपुरवठ्यामुळे ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिकेने त्वरित तपास सुरू केला. त्यानंतर भागिरथपुरा पोलीस चौकीच्या टॉयलेटखालून जाणाऱ्या नर्मदेच्या जलवाहिनीला गळती लागली होती. तसेच या गळतीमुळे दूषित पाणी जलवाहिनीमध्ये मिसळत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संपूर्ण प्रभागात दूषित पाण्याचा पुरवठा होत होता. तसेच हे दूषित पाणी पिऊन लोक आजारी पडत होते.
दरम्यान, दूषित पाण्याचे प्राशन केल्याने तब्येत बिघडून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाल्याने इंदूरमधील भागिरथपूरामध्ये खळबळ उडाली आहे. या भागातून सातत्याने नवनवे रुग्ण समोर येत आहेत. तसेच अत्यवस्थ असलेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून पुढील उपचारांसाठी मोठ्या रुग्णालयात पाठवले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून नर्मदा नदीच्या पाण्याचा वापर करू नका, असं आवाहन करणाऱ्या पोस्ट येथील सोशल मीडियावरून लोक शेअर करत होते. मात्र लोकांच्या तक्रारींकडे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले. या दूषित पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अधिकृत आकडा ३ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नेमका किती जणांचा मृत्यू झाला, याबाबच संशय व्यक्त केला जात आहे. दुषित पाण्यामुळे आतापर्यंत ११०० हून अधिक लोकांना उलट्या-जुलाब, पोटदुखीचा त्रास होत आहे. तर १११ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.