बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:43 IST2025-07-26T19:41:54+5:302025-07-26T19:43:12+5:30
Bihar Assembly Election 2025: या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी विरोधी पक्षांमधील महाआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने कंबर कसली आहे.

बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी विरोधी पक्षांमधील महाआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने कंबर कसली आहे. तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बिहार विधनासभा निवडणुकीसाठी स्क्रीनिंग कमिटीची स्थापना केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी अजय माकन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातील काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्थापन केलेल्या अजय माकन यांच्या नेतृत्वाखालील स्क्रिनिंग कमिटीमध्ये प्रणिती शिंदे, इम्रान प्रतापगडी, कुणाल चौधरी यांनाही स्थान देण्यात आले आहे. त्याशिवाय कृष्णा अल्लावरू, राजेश कुमार, शकील अहमद खान, मदन मोहन झा, देवेंद्र यादव, शहनवाझ यादव, सुशील कुमार पासी यांना या समितीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
२०२० साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १९ जागांवर विजय मिळवला होता. तर गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे तीन खासदार निवडून आले होते. त्यामुळे आता अधिक चांगली कामगिरी करण्याचं आव्हान काँग्रेससमोर आहे.
दरम्यान, सध्या बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षणाच्या मुद्यावरून विरोधी पक्ष आक्रमक झालेले आहेत. तसेच काँग्रेसनेही निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात प्रखर भूमिका घेतली आहे. तसेच राज्यात पक्षसंघटनेला बळकटी देण्यासाठी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे विशेष लक्ष देत आहेत.