Congress Meeting: काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, राहुल गांधी यांना पक्षाचा अध्यक्ष करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 20:02 IST2022-03-13T19:57:00+5:302022-03-13T20:02:08+5:30
Congress Meeting:बैठकीत पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्याबरोबरच भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.

Congress Meeting: काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, राहुल गांधी यांना पक्षाचा अध्यक्ष करण्याची मागणी
नवी दिल्ली: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची (CWC) रविवारी बैठक झाली. बैठकीत पराभवाच्या कारणांचा आढावा घेण्याबरोबरच भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी स्वतः या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. या बैठकीत राहुल गांधी, प्रियांका वड्रा, हरीश रावत, मल्लिकार्जुन खर्गे आणि अंबिका सोनी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
राहुल यांना अध्यक्ष करण्याची मागणी
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसचे काही नेते आणि कार्यकर्ते पक्ष मुख्यालयाजवळ जमले आणि त्यांनी राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदी नियुक्तीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यामध्ये दिल्ली प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा अलका लांबा, अनिल भारद्वाज यांच्यासह अनेक नेत्यांचा सहभाग होता. या नेत्यांनीही राहुल गांधींच्या समर्थनार्थ धरणे आंदोलन केले. अलका लांबा म्हणाल्या की, काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्याला राहुल यांना अध्यक्षपदी पाहायचे आहे.
कांग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी जी की अध्यक्षता में कांग्रेस कार्यसमिति की बैठक pic.twitter.com/6J13RUHLHC
— Congress (@INCIndia) March 13, 2022
गेहलोत यांनीही राहुल यांच्या बाजूने आवाज उठवला
सभेपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, निवडणुकीत पराभव आणि विजय होतच असतो. एक काळ असा होता की भाजपला 542 पैकी फक्त दोनच जागा मिळाल्या होत्या. भाजप धर्माचे राजकारण करुन इथपर्यंत आले आहे. आज ना उद्या देशवासीयांना समजेलच. आमचा मार्ग एकता आणि अखंडतेचा आहे. पीएम मोदी आणि केजरीवाल सारखेच बोलतात. आग लावणे खूप सोपे आहे पण ती विझवणे खूप कठीण आहे. राहुल गांधींनी अध्यक्ष व्हावे, यानेच पक्ष एकसंध राहील.
असंतुष्ट गटही सक्रिय आहेत
शुक्रवारी काँग्रेसमधील असंतुष्ट गटाच्या म्हणजेच जी-23 गटातील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली, ज्यामध्ये भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला आनंद शर्मा, कपिल सिब्बल आणि मनीष तिवारी यांसारखे दिग्गज उपस्थित होते. दरम्यान, गांधी कुटुंबातील सदस्यांनी सर्व संघटनात्मक पदांचा राजीनामा दिल्याचे वृत्त काँग्रेस पक्षाने फेटाळून लावले.