महाआघाडीत फूट? काँग्रेस तृणमूल काँग्रेसविरोधात लढवणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 21:41 IST2018-09-03T21:41:08+5:302018-09-03T21:41:48+5:30
2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर देशव्यापी आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडीचा घाट घातला आहे. मात्र...

महाआघाडीत फूट? काँग्रेस तृणमूल काँग्रेसविरोधात लढवणार निवडणूक
कोलकाता - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपासमोर देशव्यापी आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांकडून महाआघाडीचा घाट घातला आहे. मात्र ही महाआघाडी आकारास येण्यापूर्वीच तिच्यात फूट पडण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पश्चिम बंगालमध्येकाँग्रेस सत्ताधारी तृणमूल काँग्रेससोबत आघाडी करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र काँग्रेसने ही शक्यता फेटाळून लावली असून, पुढील निवडणुकीत काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि भाजपाविरोधात निवडणूक लढवेल, असे काँग्रेसचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.
याबाबत अधिर रंजन चौधरी म्हणाले की," आगामी निवडणुकीत काँग्रेस ना तृणमूल काँग्रेससोबत निवडणूक लढवणार आहे, ना भाजपाबरोबर. पुढील निवडणुकीत आम्ही या दोन्ही पक्षांविरोधात पूर्ण क्षमतेने लढणार आहोत. पश्चिम बंगालमध्ये प्रसारमाध्यमांमधील एका वर्गाकडून आमच्याविरोधात अफवा पसरवण्यात येत आहे. या बातम्या पूर्णपणे निराधार आहेत." काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी होईल, अशा आशयाचे वृत्त प्रसारित झाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना चौधरी यांनी ही माहिती दिली.
''काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आपली लढाई सुरू ठेवेल. बंगालमध्ये आमची तृणमूल काँग्रेससोबत आघाडी झालेली नाही. तसेच काँग्रेस आगामी निवडणुकीत भाजपा आणि तृणमूल काँग्रेसविरोधात लढेल, अशा परिस्थितीत कार्यकर्त्यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे चौधरी यांनी सांगितले.