काँग्रेसची सावध खेळी; दिल्लीत उमेदवारांच्या दोन याद्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 16:33 IST2019-03-14T15:31:37+5:302019-03-14T16:33:24+5:30
एक यादी 'आप'सोबत युती झाल्यानंतर संभाव्य उमेदावारांची आहे. तर दुसरी यादी 'आप'सोबतची युती रद्द झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून तयार करण्यात आली आहे.

काँग्रेसची सावध खेळी; दिल्लीत उमेदवारांच्या दोन याद्या
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पार्टी यांच्यात जोरदार घमासाण सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेसने सावध खेळी करत दिल्लीतील लोकसभेसाठीच्या सात जागांसाठी उमेदवारांच्या दोन याद्या तयार केल्या आहेत.
यापैकी पहिली यादी 'आप'सोबत युती झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांची आहे. तर दुसरी यादी 'आप'सोबतची युती रद्द झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून तयार करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या घडामोडीवरून आम आदमी पक्ष आणि आणि दिल्ली काँग्रेस यांच्या युतीचे भवितव्य कठिण दिसत आहे. परंतु दोन्ही पक्षांमध्ये युतीची आशा कायम आहे.
उभय पक्षांच्या नेत्यामध्ये मतभेद असले तरी भाजपला रोखण्यासाठी दिल्लीत तीन-तीन-एक असा फॉर्म्युला अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. तीन जागांवर काँग्रेस आणि तीन जागांवर आम आदमी पक्ष तर उर्वरित एका जागेवर दोन्ही पक्षांच्या पसंतीचा उमेदावार देण्यात येईल, अशी शक्यता आहे.
अद्याप काँग्रेस हायकमानकडून युती संदर्भात काहीही संकेत मिळाले नसल्यामुळे उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत नसल्याचे सुत्रांनी सांगितले. लोकसभा लढविण्यासाठी काँग्रेसमधून 74 नावांची यादी प्राप्त झाली असून यामधून उमेदवार निश्चित करण्यात येणार आहेत.
'आप'सोबत युती झाल्यास काँग्रेसला नवी दिल्ली, चांदनी चौक आणि उत्तर पश्चिम जागा मिळण्याची शक्यता आहे. या जागांवर नवी दिल्लीतून अजय माकन, चांदनी चौकमधून कपिल सिब्बल आणि उत्तर पश्चिम मतदार संघातून राजेश लिलोठिया किंवा राजकुमार चौहाण यांच्यापैकी एका नावावर मोहर लागेल, असे काँग्रेसच्या आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. परंतु, युती रद्द झाल्यास तीनही जागांवरचे उमेदवार बदलण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसकडून दुसऱ्या यादीचा वापर करण्यात येईल. ज्यामध्ये नवीन आणि जुन्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.